विदर्भाच्या विकासासाठी सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. भुसावळ–वर्धा तिसरी व चौथी लाईन तसेच गोंदिया–डोंगरगढ नवीन रेल्वे मार्गाला केंद्राची मंजुरी मिळाल्याने प्रदेशातील रेल्वे संपर्क अधिक सशक्त होणार आहे.
विदर्भाच्या मातीत विकासाची नवी रोपं लावण्यासाठी सरकार सतत झटत आहे. यंदा तर केंद्र सरकारने विदर्भाच्या प्रगतीला चक्क रेल्वेच्या रुळांवर स्वार करत दोन भन्नाट प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवला आहे. भुसावळ-वर्धा मार्गावर तिसरी आणि चौथी रेल्वे लाईन आणि गोंदिया-डोंगरगढ नवीन रेल्वे मार्ग यामुळे विदर्भाचा चेहरामोहरा बदलणार आहे. माजी खासदार सुनील मेंढे यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर असा, की गगनात मावेना. या प्रकल्पांमुळे विदर्भाच्या विकासाचा ट्रॅक इतका मजबूत होणार आहे, की भविष्यात इथली जनता रेल्वेच्या गतीने प्रगतीकडे झेप घेईल.
या दोन रेल्वे प्रकल्पांनी विदर्भाच्या आर्थिक आणि सामाजिक चाकांना गती देण्याची तयारी केली आहे. भुसावळ-वर्धा मार्गावर नव्या लाईन्समुळे रेल्वेचा ताण हलका होणार आहे. तर गोंदिया-डोंगरगढ मार्ग विदर्भाला छत्तीसगडशी जोडणारा सोन्याचा पूल ठरणार आहे. या प्रकल्पांचे श्रेय सुनील मेंढे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि पालकमंत्री पंकज भोयर यांना दिले आहे. मेंढे यांच्या शब्दांत सांगायचे तर, हा निर्णय म्हणजे विदर्भाच्या विकासाच्या गाडीला टर्बो बूस्टर लावण्यासारखा आहे.
रेल्वेचा रुळ
भुसावळ-वर्धा मार्ग हा मध्य भारताचा रेल्वेचा कणा आहे. पण सध्याच्या दोन लाईन्सवर प्रवासी आणि मालगाड्या अक्षरशः धडपडताहेत. आता तिसरी आणि चौथी लाईन उभारण्यासाठी 9 हजार 197 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. 314 किलोमीटरचा हा मार्ग पुढील पाच वर्षांत पूर्ण होईल. यामुळे रेल्वे गाड्या जणू विदर्भाच्या मातीतून विमानाच्या गतीने धावतील. मालवाहतूक जलद होईल. नागपूर, भंडारा, गोंदियातील व्यापारी जणू रेल्वेच्या डब्यात बसूनच नवे बाजारपेठ काबीज करतील.
Corporation Election : मूर्तिजापूर नगरपरिषदेची सत्ता येणार महिलांच्या हातात
गोंदिया-डोंगरगढ नवीन रेल्वे मार्ग हा विदर्भ आणि छत्तीसगड यांच्यातील मैत्रीचं नवं प्रतीक ठरणार आहे. हा मार्ग उद्योग, व्यापार आणि पर्यटनाला चालना देणारा ठरेल. यामुळे रोजगाराच्या संधी तर वाढतीलच, पण पर्यावरणालाही फायदा होईल. दरवर्षी 9 कोटी लिटर डिझेलची बचत आणि 45 कोटी किलो कार्बन उत्सर्जन कमी होईल. हा प्रकल्प विदर्भाच्या हवेत ऑक्सिजन आणि अर्थकारणात समृद्धी भरेल. सुनील मेंढे यांनी या प्रकल्पांना विदर्भाच्या विकासाचा ‘गेमचेंजर’ म्हटलं आहे. खरंच, ही रेल्वे गाडी विदर्भाला प्रगतीच्या फास्ट ट्रॅकवर घेऊन जाणार आहे.
