महाराष्ट्रात 2024 विधानसभा निवडणुकीत मत चोरीचा आरोप पुन्हा उफाळला आहे. अमरावती जिल्ह्यात थेट मतदार यादीतून वीस पेक्षा जास्त गावे गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय मैदानात 2024 विधानसभा निवडणुकीची आग अद्यापही विझलेली नाही. काँग्रेस नेते राहुल गांधींनी भाजप आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचे गंभीर आरोप करून खळबळ उडवली होती. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असताना, अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदार यादीतून चक्क 28 गावे गायब झाल्याने लोकशाहीच्या मुळावर हल्ला चालला असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. त्यांच्या तीव्र प्रतिक्रीयेने राजकीय वातावरण तापले आहे.
तुपकर यांनी हे प्रकरण राजकीय षड्यंत्र असल्याचे सांगितले. मतदार यादीतून थेट गावे गायब करणे हा फक्त घोळ नाही, तर लोकशाहीवर थेट हल्ला आहे. निवडणूक आयोग असा कारभार करणार असेल तर निवडणूक घेता कशाला? जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, अशा शब्दांत त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगाला चांगलेच झोडपले. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हा प्रकार उघड झाला. शशिकांत मंगळे यांच्या तक्रारीमुळे खळबळ माजली. एकाच तालुक्यातील 28 गावे मतदार यादीतून गायब झाल्याने, सुमारे 8 हजार मतदारांचा मतदानाचा हक्क धोक्यात आला होता.
Charan Waghmare : तुटलेल्या स्वप्नांसह बळीराजा अनुभवणार काळी दिवाळी
तांत्रिक अडचणींवर स्पष्टीकरण
मंगळे यांनी तात्काळ दखल घेतली आणि जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली. यामुळे वेळीच कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या 8 हजार मतदारांना मतदानाची संधी मिळू शकते. मंगळे यांनी पुढे मागणी केली की, अमरावती जिल्ह्यातील सर्व मतदार याद्या तपासाव्यात. गट आणि गणनिहाय चूक दुरुस्ती करून नव्याने यादी प्रसिद्ध करावी, अन्यथा हा प्रकार निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर कलंक ठरेल. या प्रकरणाने स्थानिक राजकारणात भूकंप आल्यासारखे वातावरण आहे. शेतकरी नेते तुपकर यांनी हे फक्त अमरावतीपुरते मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
निवडणूक विभागाकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली होती. काही तांत्रिक अडचणींमुळे काही भाग अपलोड झाले नाहीत, असे उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांनी सांगितले. सुटलेल्या यादी भागांचे पुन्हा चार्ट तयार करून अपलोड करत आहोत. कुठलाही मतदार सुटणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. अंतिम यादी प्रसिद्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तरीही, हे स्पष्टीकरण अनेकांना समाधानकारक वाटत नाही.
Police Bravery : अंधारावर मात करत गडचिरोलीच्या मातीचा दीपोत्सव
