
महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर प्रशासकीय फेरबदल सुरू झाले आहे. याचा क्रम सध्या कायम आहे.
महाराष्ट्रामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय रचनेत अनेक बदल केले आहेत. त्यानुसार काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर काही अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. आता पुन्हा राज्य सरकारने 18 अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली आहे. पदोन्नती देत या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. आणखी काही दिवसांपर्यंत फेरबदलाचा हा क्रम कायम राहणार असल्याचे दिसत आहे.
राष्ट्रीय ग्रामीण जीवनन्नोती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी यांना नवीन वर्षात पदोन्नत करण्यात आले आहे. अल्पसंख्यांक विभागाच्या सचिव पदी त्यांना पाठवण्यात आले आहे. उर्वरित 17 अधिकाऱ्यांना सध्या ते कार्यरत असलेल्या पदावरच प्रमोशन मिळाले आहे. नगर विकास विभागाचे प्रधान सचिव असीम कुमार गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी, दिनेश वाघमारे यांना प्रधान सचिव पदावरून अपर मुख्य सचिव श्रेणीत पदोन्नती देण्यात आली.

अधिकाऱ्यांना New Year Gift
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांना पदोन्नती देऊन त्याच पदावर कायम ठेवले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव एन. नवीन सोना यांना प्रधान सचिवपदी पदोन्नती देण्यात आली आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक विमला आर. यांना त्याच पदावर ठेवत पदोन्नती देण्यात आली आहे. विमला यापूर्वी नागपूर जिल्ह्याच्या कलेक्टर होत्या. नागपूरतून त्यांची बदली प्रकल्प संचालक म्हणून करण्यात आली होती. राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक ए. बी. धुळाज यांना याच पदावर पदोन्नती दिली आहे.
अशोक करंजकर यांना पदोन्नतीसह राज्य वित्तीय महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी केली आहे. सोलापूर महानगर पालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनाही पदोन्नती दिली असून त्याच पदावर कायम ठेवले आहे. महाराष्ट्र कृषी संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे सदस्य सचिव रावसाहेब भागडे यांना सध्याच्याच पदावर ठेवत पदोन्नती देण्यात आली आहे. मिलिंद बोरीकर, शंतनू गोयल, रवींद्र बिनवडे, दीपक सिंगला, डॉ. कुणाल खेमनार या अधिकाऱ्यांना सिलेक्शन ग्रेडमध्ये पदोन्नती देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या सेवेत गेलेल्या निधी चौधरी आणि पीयूष सिंग यांनाही राज्य सरकारने पदोन्नती दिली आहे. नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनवणे यांची बदली केली मात्र नियुक्ती देण्यात आलेली नाही. सोनवणे यांच्या जागी सध्याचे कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांची नियुक्त्ती करण्यात आली आहे. सध्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांची बदली कृषी आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.
बिनवडे यांचीही गेल्या वर्षीच कृषी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनाही वर्षभराच्या आतच नोंदणी महानिरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले सचींद्र प्रतापसिंह यांच्याकडे शिक्षण आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्याचे महिला व बालविकास आयुक्त प्रशांत नारनवरे यांची मुंबईत मंत्रालयात बदली करण्यात आली.