चंद्रपूर जिल्हा बँकेतील भरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची कठोर चौकशी करण्यात येणार, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. तर आम आदमी पार्टीने या प्रकरणाची तक्रार ‘ईडी’कडे केली दाखल केली.
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून लिपिक आणि शिपाई पदाच्या भरतीसाठी मुलाखती झाल्या. त्यानंतर भाजप ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मनोज पोतराजे जिल्हा बँकेतील नोकरभरतीच्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले. चंद्रपूर जिल्हा बँकेतील नोकरभरतीची सर्वंकष चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनीद्वारे चर्चा करून दिले. त्यानंतर मनोज पोतराजे यांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते लिंबूपाणी पिऊन उपोषणाची सांगता केली.
या नोकरभरती प्रकरणाची उच्चस्तरीयच चौकशी करावी, या मागणीसाठी सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन देण्यात आले. पोतराजे यांच्या उपोषणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी पोतराजे यांच्यासोबत भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला व सविस्तर चर्चा केली. नोकर भरतीच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. भरतीप्रक्रियेत जी अनियमितता झाली, त्याचीही चौकशी होणार. त्यामुळे आपण उपोषण मागे घ्यावे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यानंतर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पोतराजे आणि काळबांडे यांनी उपोषण सोडले.
निवडणुकीतील यश-अपयशाला न पाहता, कामावर लक्ष केंद्रित करणारे Sunil Mendhe
गाठली दिल्ली
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 358 पदांच्या भरतीप्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी आपचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, आदित्य नंदनवार आणि रोहन गुजेवार यांनी थेट नवी दिल्ली गाठून ईडी कार्यालयात तक्रार दाखल केली.
बँकेतील भरती प्रक्रियेत मागासवर्गीयांचे (एससी, एसटी, ओबीसी व महिला) आरक्षण काढून टाकण्यात आले आहे. 31 हजारांपेक्षा अधिक उमेदवारांपैकी केवळ तीन जिल्ह्यांतील (चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ) उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय निवड झालेले उमेदवार बँकेशी संबंधित असल्याचेही उघड झाले आहे. या प्रक्रियेत कोट्यवधींची देवाणघेवाण झाल्याचा आरोपही आम आदमी पक्षाने केला आहे.
आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने ‘ईडी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन दिले आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहेत. ही भरतीप्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर आणि अपारदर्शक आहे. चंद्रपूरातील सामान्य विद्यार्थ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करण्याचा हा डाव आहे. भरतीप्रक्रियेची चौकशी आणि दोषींवर कारवाई होईपर्यंत लढा सुरूच ठेवू. भ्रष्टाचार उघड करण्यासाठी आंदोलन करू. पीडित बेरोजगारांनी आम आदमी पक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन मयूर राईकवार यांनी केले आहे.
