
पक्षातील पडझड थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे लवकरच पुणे दौऱ्यावर शाखा प्रमुखांसोबत बैठक घेणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाला सध्या गळतीचा जोरदार फटका बसत आहे. विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर पुण्यातील ठाकरे गटाची वाताहत झाल्याचे चित्र दिसत आहे. माजी नगरसेवकांसह अनेक शाखाप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे पक्षाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
या परिस्थितीला हाताळण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाचे शहर प्रमुख संजय मोरे आणि नेते वसंत मोरे यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी यावेळी ठाकरेंना लवकरच पुण्यातील शाखाप्रमुखांना भेटण्याची विनंती केली होती. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

धक्क्यावर धक्के
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देणे सुरू केले आहे. विधानसभा निवडणुकीतील खराब कामगिरीमुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता होती. याचा फायदा घेत भाजप आणि शिंदे गटाने ठाकरे गटातील माजी नगरसेवकांना फोडले आहे. हडपसरमधील माजी आमदार महादेव बाबर यांचा शिंदे गटात प्रवेश होण्याची चर्चा जोर धरत आहे. त्याचबरोबर माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांचाही शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उद्धव ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात सर्व शाखाप्रमुख, विभाग प्रमुख आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न होणार आहे. या बैठकीत पक्षातील पडझड थांबवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. ठाकरे यांच्याकडून शाखाप्रमुखांना पक्षाशी निष्ठा राखण्याचे आवाहन करण्यात येईल, तसेच आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रभावी रणनीती आखली जाईल.
व्यापाऱ्यांनो..! व्यावसायिक वापराच्या Gas Cylinder बद्दल हे ठाऊक आहे का?
महापालिकेवर लक्ष
पुण्यातील आगामी महापालिका निवडणूक ही ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या गोटात सकारात्मक बदल घडवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा पुणे दौरा निर्णायक ठरेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. उद्धव ठाकरे यांची भेट आणि त्यातून पक्षाच्या भवितव्याबाबत होणारे निर्णय पक्षाला नवीन ऊर्जा देऊ शकतात का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पुण्यात मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाचे नेते, कार्यकर्ते आपल्या गोटात घेतले आहेत. यामुळे ठाकरे गटाची पकड ढिली झाली आहे. या गळतीला थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे.