
आयएएस पूजा खेडकर यांच्यावर यूपीएससीमध्ये चुकीची माहिती प्रदान करण्याचा आरोप आहे. त्यानंतर आणखी एक जिल्हा उत्पादन शुल्क महिला अधिकारी यांनी चुकीची माहिती देऊन पद मिळवले, असा आरोप होत आहे.
राज्यात पूजा खेडकर यांचे प्रकरण अद्याप ताजे असतानाच आणखी एका महिला अधिकाऱ्याच्या भरतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अपंग कोट्यातून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.
तिन्ही वर्षांपूर्वी दिव्यांग कोट्यातून भरती झालेल्या जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी प्रियंका कदम यांच्या नृत्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये त्या केवळ नृत्य करत नाहीत, तर अत्यंत ऍक्टिव्ह दिसत आहेत. काही व्हिडिओंमध्ये त्या डीजेच्या तालावर थिरकत आहेत, तर काही व्हिडिओंमध्ये त्या सहज धावताना दिसत आहेत. परिणामी, “त्या खरोखर दिव्यांग आहेत का?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कुणीच तयार नव्हते म्हणून Congress पक्षाला शोधावा लागला बळीचा बकरा
चौकशीची मागणी
राष्ट्रीय सुशिक्षित युवा संघाने या प्रकरणी भरती प्रक्रियेत हेराफेरी झाली असल्याचा संशय व्यक्त केला आहे. एमपीपीएससीच्या निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पारदर्शकतेच्या अभावाची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. जर खरोखर अपंग कोट्यात फेरफार झाला असेल, तर पात्र उमेदवारांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी संघटनेकडून केली जात आहे.
वादानंतर प्रियंका कदम यांनी स्वतःचा एक्स-रे रिपोर्ट सादर करत आपल्या अपंगत्वाबाबत खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या दोन्ही पायांच्या हाडांना गंभीर दुखापत झाली होती आणि त्यासाठी रॉड टाकून शस्त्रक्रिया करण्यात आली. कदम पुढे म्हणाल्या की, “अपंग असणे म्हणजे केवळ व्हीलचेअरवर बसणे नव्हे. समाजात याबाबत संकुचित विचारसरणी आहे. वेदनाशामक गोळ्या घेतल्यानंतर मी काही वेळ नृत्य करू शकते. त्यामुळे मला डान्स करताना पाहून कोणीही माझ्या अपंगत्वावर प्रश्न उपस्थित करू शकत नाही, असे कदम म्हणाल्या.
मेहनतीने गाठले ध्येय
प्रियंका कदम यांनी आपल्या संघर्षाविषयी सांगताना म्हटले, “मी एका सामान्य कुटुंबातून आले आहे. वडील मजूर होते आणि आई शिवणकाम करायची. बालपणी मी वॉकर आणि नंतर काठीच्या साहाय्याने चालत असे. आता मी आत्मविश्वासाने चालते. माझे अपंगत्व कायमस्वरूपी नाही. मात्र डॉक्टरांनी मला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
लहानपणापासूनच आपल्याला नृत्याची आवड असल्याचे प्रियंका कदम यांनी सांगितले. विशेष प्रसंगी वेदनाशामक घेतल्यावर काही मिनिटे आपल्याला नृत्य करता येते, असेही त्या म्हणाल्या. मात्र, त्यानंतर पुन्हा वेदना जाणवतात. लोकांना वाटते की अपंग व्यक्ती नाचू शकत नाही, मात्र तसे नसते.
संघटनेच्या पदाधिकारी राधे जाट यांनी म्हटले आहे की, फक्त प्रियंका कदमच नाही, तर इतर अनेक उमेदवार अपंग कोट्यातून भरती झाले आहेत. मात्र, त्यांची शारीरिक स्थिती वेगळी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एमपीपीएससीच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता होती का, याबाबत शंका उपस्थित होत आहे. पात्र उमेदवारांना योग्य न्याय मिळावा यासाठी या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे. आता सरकार आणि प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.