महाराष्ट्र

मुंडे – धस Hospital मध्ये भेटले, बंद दाराआड Operation ठरले

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, Forget Everything

Author

धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या गुप्तभेटीमुळे बीडमध्ये राजकीय वादंग. प्रसंगी उपस्थित असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोघांमध्ये मतभेद नसल्याचा दावा प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. 

बीड जिल्ह्यातील राजकारण दिवसेंदिवस अधिकच तापत आहे. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरू झालेला वाद आता वेगळ्याच वळणावर पोहोचला आहे. राज्याचे अन्नपुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. त्यांचा राजीनामा मागण्याचा दबाव वाढत आहे. त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलेले भाजप आमदार सुरेश धस यांनीही या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर आक्रमक पवित्रा घेतला होता.

दोघांमध्ये अचानक गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात तुफान चर्चा सुरू झाली आहे. ही बैठक नेमकी कशासाठी झाली? संघर्षाचा शेवट होतोय की नव्या समीकरणांची सुरुवात होतेय? हा सर्व प्रकार म्हणजे राजकीय गटातील एक मोठं नाट्य ठरत आहे.

पुणे पोलिस आयुक्तांना Amol Mitkari यांचे खुले आव्हान

गुप्त भेटीचं राजकारण

बीडमध्ये राजकीय वातावरण गढूळ होत असताना, धस आणि मुंडे यांची एका खासगी रुग्णालयात गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या भेटीला दुजोरा देत, “मुंडे आणि धस यांच्यात मतभेद असले तरी मनभेद नाहीत,” असं विधान केलं आहे.ही भेट केवळ सौजन्यभेट होती का यामागे काही वेगळी रणनीती होती? हे सध्या कोड्यात आहे. मात्र, ही गुप्त बैठक जाणीवपूर्वक लपवण्याचा प्रयत्न का झाला? यावरून विरोधकांकडून ताशेरे ओढले जात आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर आरोप झाले होते, तेव्हा सुरेश धस यांनी त्यांच्यावर थेट निशाणा साधला होता. “आका, मोठा आका” असा उल्लेख करत त्यांनी धनंजय मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर हल्ला चढवला होता.मात्र, अचानक मुंडे यांची भेट घेऊन धस यांनी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली, हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, हेच धस काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. त्यामुळे आता राजकीय गटात चर्चा सुरू झाली आहे की, धस आपली भूमिका बदलत आहेत का? किंवा भाजपचं हत्यार म्यान होणार का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

सपकाळ, वडेट्टीवारांवर Congress कडून प्रेम कायम; नानांसोबत ब्रेकअप

पक्षांतर्गत मतभेद वाढले

या गुप्त भेटीनंतर भाजपच्या अनेक स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. सुरेश धस हे भाजपच्या वतीने धनंजय मुंडेंना धक्का देण्याच्या प्रयत्नात होते, पण त्यांनीच जर आता आपली लढाई थंड केली तर पक्षाच्या इमेजला मोठा धक्का बसू शकतो.भाजपमध्ये आताच नव्याने संघर्ष सुरू झाल्याची चिन्हे आहेत. काही स्थानिक नेत्यांना वाटतं की, “धस यांनी जर मवाळ भूमिका घेतली तर पक्षाच्या आक्रमक धोरणावर परिणाम होईल.” त्यामुळे येत्या काळात धस यांना स्पष्टीकरण द्यावं लागू शकतं.

धनंजय मुंडेंच्या राजकीय अस्तित्वावर टांगती तलवार होती. विरोधक सातत्याने त्यांना राजीनामा देण्याची मागणी करत होते. पण उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंडेंचा राजीनामा घेणं दूरच, उलट त्यांना राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीमध्ये स्थान दिलं.त्यामुळे आता जर धसही मवाळ झाले, तर मुंडेंच्या राजकीय पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. ही सर्व समीकरणे पाहता, बीड जिल्ह्यातील राजकारण आणखी तापणार आहे. भविष्यात धस आणि मुंडेंच्या संबंधांवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची पुढील रणनीती ठरणार आहे. ही गुप्त भेट फक्त तब्येतीची विचारपूस होती की नवा राजकीय डाव, याचा उलगडा लवकरच होईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!