महाराष्ट्र

निघाला मुहूर्त; Harshwardhan Sapkal स्वीकारतील प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे 

अचानक निर्णय झाल्याने Congress मधील नाराज गटात अस्वस्थता 

Post View : 56

Author

हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. 18 फेब्रुवारी रोजी ते प्रदेशाध्यक्षाचा पदभार स्वीकारतील, असे बोलले जात आहे. तर सपकाळ यांना राहुल गांधींकडून मिळालेलं हे बक्षीस आहे, असे कार्यकर्त्यांना वाटत आहे. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसल्यानंतर पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना पदावरून हटवून त्यांच्या जागी बुलढाण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना हा निर्णय राहुल गांधींच्या निष्ठावंताला मिळालेलं बक्षीस वाटत आहे.

13 फेब्रुवारी रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी अधिकृत पत्रक जाहीर करत पटोलेंना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवून सपकाळ यांच्या निवडीची घोषणा केली. मात्र, सपकाळ यांनी अद्याप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलेली नाहीत. हर्षवर्धन सपकाळ मंगळवारी टिळक भवनात औपचारिक पदभार स्वीकारणार, अशी शक्यता आहे.

भल्या भल्या मातब्बरांना डावलून Harshwardhan Sapkal यांची निवड 

अपेक्षेच्या पलीकडे

हा निर्णय अचानक झाल्याने पक्षातील नाराज गटामध्ये अस्वस्थता आहे. काँग्रेसच्या अंतर्गत गोटातील सूत्रांनुसार, हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव स्पर्धेत नव्हतेच. बाळासाहेब थोरात इच्छुक नसले तरी पृथ्वीराज चव्हाण, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम यांची नावे चर्चेत होती. त्यामुळे अनुभवी व वरिष्ठ नेत्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी केली होती.

मागील दोन दिवसांपासून दिल्लीतील काँग्रेस हायकमांडमध्ये या बदलांसाठी हालचाली सुरू होत्या. 12 फेब्रुवारी बुधवार रोजी दुपारी हर्षवर्धन सपकाळ यांना बोलावून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहात का, याची चाचपणी करण्यात आली. त्यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानंतर राहुल गांधींच्या संमतीनंतर त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली.

‘रूको जरा सब्र करो’ Nana Patole यांची इनिंग बाकी आहे

उत्साह नाही 

प्रदेशाध्यक्षाच्या बदलानंतर राज्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अपेक्षित उत्साह दिसून आलेला नाही. पटोले हटणार हे निश्चित झाल्यानंतर अनुभवी नेतृत्व मिळेल अशी आशा होती. मात्र राहुल गांधींच्या निर्णयासमोर कोणीही आक्षेप घेत नाही.

हा बदल काँग्रेसच्या इतिहासातील 1982 सालच्या बाबासाहेब भोसले यांच्यावरील प्रयोगाशी तुलना करत पाहिला जात आहे. दिल्लीत मुकुल वासनिक यांच्या समर्थकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हायकमांडला पटोले हटवण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे बोलले जात आहे. मात्र, काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने हा निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या संमतीने घेतल्याचा दावा केला आहे. आता हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र काँग्रेस कशा पद्धतीने नव्या वाटचालीस सुरुवात करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!