
पुण्यात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत रिसॉर्टवर पार्टी केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महसूल मंत्र्यांवर गंभीर आरोप करत सरकारला धारेवर धरले आहे.
विजय वडेट्टीवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक परखड, आक्रमक आणि जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे नेते म्हणून ओळखले जातात. विदर्भाचा बुलंद आवाज असलेल्या वडेट्टीवार यांनी आपल्या आक्रमक भूमिकेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. स्पष्टवक्तेपणा, तडफदार नेतृत्व आणि कोणत्याही सरकारवर थेट हल्लाबोल करण्याची धमक यामुळे ते सातत्याने चर्चेत असतात.
काँग्रेस पक्षाचे एक मजबूत स्तंभ असलेले वडेट्टीवार हे विदर्भाच्या विकासासाठी नेहमीच आक्रमक राहिले आहेत. मात्र अनेकदा त्यांचे बोलणे त्यांना अनेकदा भारी पडतांना दिसतात. आक्रमक शैलीमुळेच ते विरोधकांसाठी कायमच धोक्याची घंटा ठरले आहेत.

अधिकाऱ्यांची रिसॉर्टवर पार्टी
पुण्यातील खेड तालुक्यात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत रिसॉर्टवर पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत गंभीर आरोप करत महसूल मंत्र्यांवर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी सोशल मीडियावर काही व्हिडिओ आणि फोटो शेअर करत ही माहिती उघडकीस आणली आहे. या व्हिडिओंमध्ये महसूल विभागातील काही वरिष्ठ अधिकारी धिंगाणा घालताना दिसत असून, यामुळे महसूल विभागाचा चक्काचूर झाल्याचे बोलले जात आहे.
एकीकडे सर्वसामान्य नागरिकांवर अनधिकृत बांधकामांबाबत कडक कारवाई केली जाते, घरं पाडली जातात, तर दुसरीकडे महसूल अधिकारी स्वतः अनधिकृत रिसॉर्टवर मौजमजा करताना दिसत आहेत. यामुळे सरकारच्या दोन वेगवेगळ्या चेहऱ्यांचा पर्दाफाश झाला आहे. विजय वडेट्टीवार यांनी थेट महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जाब विचारला असून, हे सर्व तुमच्या खात्यात चालले आहे, याबाबत तुम्हाला काहीच माहिती नाही का? असा सवाल उपस्थित केला आहे.
Maharashtra Politics: ब्रँड ठाकरे वाचवण्यासाठी उद्धव-राज एकत्र
नरेंद्र महाराजांवर टीका
दुसरीकडे मुंबईत एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विजय वडेट्टीवार यांनी भाजपच्या विजयामागे साधू-संतांचा हात असल्याच्या नरेंद्र महाराज यांच्या दाव्यावर टीका केली. नरेंद्र महाराज यांना स्वप्न पडले की त्यांनी भाजपचा प्रचार केला? राज्यातील जनतेने आपले मतदान केले आणि लोकशाहीत निवडणुका जिंकल्या जातात. जर कोणी धर्माच्या नावावर मतांचे ध्रुवीकरण करत असेल तर तो खरा संत नाही!” असे वडेट्टीवार म्हणाले.
या वक्तव्यामुळे महाराजांचे भक्त आक्रमक झाले आहेत. पुणे, नागपूर, मुंबई, नाशिकसह राज्यभर संतांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. भक्तगणांनी वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त केला. हे केवळ आंदोलन नसून हा संतांच्या अपमानाचा प्रतिशोध असल्याचा भक्तांचा दावा आहे.
वक्तव्यावर ठाम
विजय वडेट्टीवार यांनी या आंदोलनांना अद्याप गांभीर्याने घेतल्याचे दिसत नाही. त्यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम राहत संतांचे भक्त म्हणजे भाजपचे गुप्त प्रचारक असल्याचा सूचक इशारा दिला आहे. “धर्माचा वापर राजकारणासाठी करणारे संत कसे असू शकतात? त्यांनी भक्ती करावी, राजकारणात पडू नये!” असे वडेट्टीवार म्हणाले.
भाजपने यावर जोरदार पलटवार केला असून, काँग्रेस आणि वडेट्टीवार हिंदू धर्माचा अपमान करत असल्याचा आरोप केला आहे. “ही काँग्रेसची परंपरा आहे. यांना हिंदू संत आणि धर्मगुरू मान्य नाहीत. सतत ते हिंदूंच्या भावना दुखावतात, आणि आता त्यांनी नरेंद्र महाराजांसारख्या पूजनीय संतांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले आहे,” असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. भाजपने संतांच्या भक्तगणांना आणखी चिथावणी देत, हा लढा अधिक तीव्र करण्याचा संकेत दिला आहे.