अकोल्यातील महावितरणचा कारभार सध्या रामभरोसे सुरू आहे. दोन महत्वाचे अधिकारी परिमंडळातून गायब आहेत. याकडं प्रशासन आणि सरकारचं दुर्लक्ष आहे.
विकासापासून कोसो दूर असलेल्या अकोल्यात सध्या प्रशासकीय गोंधळ बघायला मिळत आहे. अकोला महावितरणमध्ये सध्या दोन महत्वाच्या पदांवर पूर्णवेळ अधिकारी नाही. परिमंडळाचे मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता ही ती दोन पदं आहेत. मुख्य अभियंता सुहास रंगारी यांची बदली झाली आहे. तेव्हापासून या पदावर पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करण्यात आलेला नव्हता. त्यानंतर राजेश नाईक यांची अकोल्यात नेमणूक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. नाईक हे यापूर्वी मुंबई, नागपुरात कार्यरत होते.
अकोल्याच्या अधीक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर या देखील प्रदीर्घ रजेवर आहे. अकोल्यात त्यांच्या विरोधात मोठं आंदोलन झाल्यापासून शंभरकर या रजेवर आहेत. मात्र त्यांच्या या प्रदीर्घ रजेकडं महावितरण प्रशासनाचं अजिबातच लक्ष नाही. त्याचा परिणाम प्रशासकीय कामावर होत आहे. अकोला जिल्ह्यात नेमणूक घेण्यासाठी अधिकारी फारसे उत्सुक नसतात. अनेक कर्तबगार आयएएस, आयपीएस अधिकारी अकोल्यात नेमणूक टाळतात. महापालिका, जिल्हा परिषदेत नियुक्तीसाठीही फारसे कुणी उत्सुक नसते. असाच प्रकार आता महावितरणबाबतही दिसत आहे.
मुख्य अभियंता सुहास रंगारी यांच्या बदलीनंतर येथे नवी नियुक्ती करण्यात आली नव्हती. बरेच दिवसापर्यंत या पदाचा अतिरिक्त कार्यभार दुसऱ्या अधिकाऱ्याकडं देण्यात आला होता. अकोल्यामध्ये नियुक्ती मिळणार नाही, यासाठी अधिकाऱ्यांनी ‘प्रकाशगड’मध्ये खिसा ढिला करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता नाईक यांना पाठविण्यात आल्याचं ‘महावितरण’च्या मुख्यालयातून सांगण्यात आलं. नाईक यांनी सोमवारी पदभार स्वीकारला आहे. अकोला परिमंडळातील प्रशासनाची विस्कटलेली घडी बसविण्याचं आव्हान नाईक यांना पेलावं लागणार आहे.
नागपूरची ओढ
अधीक्षक अभियंता प्रतीक्षा शंभरकर गेल्या अनेक दिवसांपासून रजेवर आहेत. त्यांच्या विरोधात मध्यंतरीच्या काळात मोठं आंदोलन झालं. त्यांना कोणत्याही परिस्थितीत अकोल्यातून बदली हवी आहे. त्यांना नागपूरला जाण्याची ओढ लागली आहे. त्यामुळं त्यांनी जाणीवपूर्वक काही वाद ओढवून घेतल्याचं सांगण्यात येत आहे. अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांच्याशीही त्यांनी बऱ्यापैकी वाद घातला होता. निवडणुकीपूर्वी शंभरकर यांना अनेकांना आमदार सावरकर यांच्या विरोधात भडकवले होते. सावरकर पुन्हा निवडून येणार नाहीत. त्यामुळं त्यांना तुम्ही घाबरू नका, असा सल्ला शंभरकर यांना काही मंडळींकडून देण्यात आला होता. मात्र चित्र वेगळंच झालं. राज्यात महायुतीचं सरकार सत्तारूढ झालं. मुख्यमंत्री भाजपचा झाला. विशेष म्हणजे ऊर्जा खातंही मुख्यमंत्र्यांकडंच आलं. त्यानंतर शंभरकर रजेवर गेल्याचं सांगण्यात येत आहे.
सद्य:स्थितीत प्रतीक्षा शंभरकर या नागपुरात बदली करून घेण्यासाठी प्रचंड प्रयत्न करीत असल्याची माहिती ‘महावितरण’च्या मुख्यालयातून मिळाली आहे. मात्र जोपर्यंत बदली मिळत नाही, तोपर्यंत त्या नियमानुसार रजा उपभोगणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. सतत रजेवर राहिल्यामुळं एक तर प्रशासन स्वत:च त्यांची बदली करेल. असं न झाल्यास अकोल्यातून त्यांच्या बदलीची मागणी रेटली जाईल, असं त्यांच्या बाबतीत सांगितलं जात आहे. त्यामुळं अकोल्यातून शंभरकर यांना मुख्यमंत्र्यांच्या नागपूर विभागात बदली मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शंभरकर यांना अकोल्यातून घालवायचं असल्यास त्यांना बरेच लांबचे परिमंडळ मिळावे, असा प्रयत्नही आता सुरू झाला आहे. लवकरच त्यांच्या प्रदीर्घ रजेचा मुद्दाही ऊर्जामंत्री तथा मुख्यमंत्र्यांपुढं विचारासाठी येणार असल्याची माहिती आहे.
