
विदर्भाची पंढरी असलेल्या ज्या धापेवाड्याच्या मातीत खेळलो. बागडलो. नाचलो. त्या धापेवाड्यातील वस्त्रोद्यागाची वीण पुन्हा घट्ट करायची आहे. लवकरीच हे स्वप्न साकारणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली.
उपराजधानीपासून हाकेच्या अंतरावर असलेले धापेवाडा हे चंद्रभागा नदीच्या तिरावर वसलेलं छोटंस गाव. या गावाची आपली नाळ जुळली आहे. आजही बालपणीच्या स्मृती ताज्या आहेत. धापेवाड्यातील वस्त्रोद्योगानं या गावाला वैभव दिलं. कालांतरानं या वस्त्रोद्योगाला घरघर लागली. काहींनी एकपाठोपाठ संस्था उभ्या केल्या. संस्था बुडवल्या. त्याचा फटका धापेवाड्यातील वस्त्रोद्योगाला बसला. कपड्याची सैल पडलेली ही वीण आपल्या काळजाला पीळ देत होती. आता हे दिवस पुन्हा पालटणार आहे. धापेवाड्यातील साडीला आजही बाजारात दहा ते 12 हजार रुपयांची किंमत मिळत आहे. त्यामुळं लवकरच धापेवाड्यात वस्त्रोद्योग भवन होईल. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली.
विकास पुरुष, रोडकरी म्हणून प्रसिद्ध असलेले नितीन गडकरी यांनी रविवार, 2 मार्चचा जवळपास पूर्ण दिवसच धापेवाड्यात घालवला. गावातील गल्ल्यांमधून फिरताना त्यांच्या बालपणीच्या अनेक आठवणी ताज्या झाल्या. वस्त्रोद्योगामुळं गावाला वैभव होतं. गावातील प्रत्येक माताभगिनीच्या हातात अस्सल सोन्याच्या पाटल्या दिसायच्या. पण काहींनी मध्यंतरीच्या काळात हे वैभव हातभट्टीमध्ये बुडविलं. तेव्हापासून धापेवाड्यातील वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी मिळावी, असं वाटत होतं. आता तो क्षण आला आहे, असं गडकरी म्हणाले.

Jalgaon: भाजप नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीची खुलेआम छेडछाड
आधुनिकतेची जोड
धापेवाड्यातील वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा गडकरी यांनी केली. अनेक वर्षांपासून मंदावलेल्या वस्त्रोद्योगाला एका खास वास्तूच्या माध्यमातून चालना देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. यासाठी दोन अधिकाऱ्यांची मोठी मदत होणार असल्याचंही गडकरी म्हणाले. गावातील वस्त्रोद्योग पुन्हा सुरू झाला तर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. धापेवाडा पुन्हा कपडा केंद्र बनेल. राज्य सरकारनं धापेवाड्यासाठी विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार विकास करून देणे ही आपली जबाबदारी आहे. पण हा विकास टिकवून ठेवणं ही गावाची सामूहिक जबाबदारी असल्याचंही गडकरी यांनी नम्रपणे सांगितलं.
काही दिवसांपूर्वी गडकरी यांनी धापेवाडा टसर, धापेवाडा कॉटन साडीला प्रोत्साहन दिलं होतं. हातमाग महोत्सवात महिला विणकरांनी तयार केलेल्या साडीची स्वत: गडकरी यांनी ‘ब्रॅन्डिंग’ केलं होतं. विणकर सेवा केंद्राचे संदीप ठुब्रीकर आणि एम. व्ही. पवनीकर यांना आपण यात लक्ष घालण्याचं त्याचवेळी सांगितल्याचं गडकरी म्हणाले. आता धापेवाड्यात हातमागासह अगरबत्ती, निर्माल्यापासून खत तयार व्हावं. गावातील प्रत्येक महिला सक्षम व्हावी, अशी अपेक्षाही नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. बालपणीच्या आपल्या गावाला समृद्ध करण्यासाठी आपण हवी ती मदत करू, असेही गडकरी म्हणाले.