
नागपूरच्या डिम्पी बजाज या भाजप युवती आघाडीच्या धडाडीच्या पदाधिकारी आहेत. शिक्षण व समाजसेवेच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतानाच, सर्व समाजघटकांसाठी त्या सतत कार्यरत असतात.
कालपरवा स्त्रीला चार भिंतींच्या आत ठेवणाऱ्या समाजाने तिला मोठ्या स्वप्नांची परवानगीच दिली नव्हती. मात्र आता ती अंतराळात झेप घेत आहे, बँकांच्या उच्चपदस्थ सीईओ म्हणून नेतृत्व करत आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधान बनत आहे. तरीही, सामान्य स्त्रीसाठी आजही संघर्ष संपलेला नाही. समाजाच्या पुरुषप्रधान मानसिकतेने तिच्या वाटेवर अडथळे उभे केले, पण आता काळ बदलतोय. शिक्षण असो, राजकारण असो किंवा व्यवसाय महिला आपल्या कर्तृत्वाने नव्या उंचीवर पोहोचत आहेत. अशाच कर्तृत्वशाली महिलांपैकी एक म्हणजे नागपूरच्या डिम्पी बजाज. एक धडाडीची नेतृत्वशील व्यक्ती, शिक्षण क्षेत्रातील सेवाभावी कार्यकर्ती आणि भारतीय जनता पक्षाच्या युवा आघाडीतील एक प्रभावी नाव.
समाजसेवेची ज्योत मनामनात प्रज्वलित करणाऱ्या आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविणाऱ्या डिम्पी बजाज या भाजप युवती आघाडीच्या तरुण व तडफदार नेत्या आहेत. त्यांचा प्रवास फक्त राजकारणापुरता मर्यादित नाही. शिक्षण आणि समाजकार्याच्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्येही त्यांचा ठसा उमटत आहे. शिक्षण हे समाजाचा कणा आहे, हे त्यांनी लहानपणापासून आत्मसात केले, आणि आज त्या या क्षेत्रात एक आदर्श उदाहरण बनल्या आहेत.

आजोबांचा आशीर्वाद
डिम्पी यांना शिक्षणाचा आणि समाजसेवेचा वारसा आजोबांकडून लाभला. नागपूरच्या जरीपटका परिसरातील सिंधू एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून त्या असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे कार्य करीत आहेत. स्वतः उच्चशिक्षित असून त्या शिक्षणाची खरी ताकद समाजाला सक्षम बनवण्यात आहे, हे त्या आपल्या कार्यातून सिद्ध करत आहेत. शिक्षण हे केवळ परीक्षांपुरते नसून, ते विचारसरणी बदलणारे, आत्मनिर्भरता निर्माण करणारे आणि समाजात नवा मार्ग दाखवणारे असते, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.
तन, मनसे भाजप
राजकारण आणि समाजसेवा यांचा सुरेख मिलाफ साधत डिम्पी बजाज भाजप युवती आघाडीच्या सक्रिय पदाधिकारी म्हणून काम करत आहेत. त्यांचे नेतृत्व केवळ सिंधी समाजापुरते सीमित नाही, तर समाजाच्या प्रत्येक घटकासाठी त्या झटत आहेत. महिलांना सक्षम करण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील आहेत, त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्याचे काम सातत्याने करीत आहेत. त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट आहे, महिलांनी केवळ राजकारणातच नव्हे, तर शिक्षण, उद्योग आणि समाजकार्यातही अग्रेसर राहावे.
Anuja Kedar : प्रचंड वैभव; अहंकाराचा लवलेश नाही, जोडीला आध्यात्म, सोज्वळतेची जपणूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही त्यांचे कार्य गौरवले आहे. त्यांचा उत्साह, जिद्द आणि समाजसेवेची तळमळ पाहता, त्या भविष्यात समाजाच्या आणखी मोठ्या सेवेसाठी प्रेरणास्त्रोत बनतील, यात शंका नाही. डिम्पी बजाज या तरुण मुलींना समाजसेवा आणि नेतृत्वाचा नवा मार्ग दाखवणाऱ्या एक सशक्त महिला आहेत.