
विधिमंडळात अर्थसंकल्पावर चर्चा करतांना सुधीर मुनगंटीवार यांनी लाडकी बहीण योजना सुरू असल्याने विरोधकांच्या पोटात दुखतंय असा खोचक टोला लगावला.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आठवा दिवस आर्थिक राजधानीत पार पडला. या दिवशी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली, परंतु चर्चेचा केंद्रबिंदू ठरली राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना. राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेबाबत विस्तृत चर्चा करताना सरकारला विविध मुद्द्यांवर धारेवर धरले. सोबतच विरोधकांच्या भूमिकेवरही त्यांनी सडेतोड भाष्य केले.
योजनांच्या अंमलबजावणीवर बोलताना मुनगंटीवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, लाडकी बहीण योजना ही केवळ आर्थिक मदत नाही, तर ती महिलांच्या सक्षमीकरणाचा एक टप्पा आहे. त्यांनी अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान काही सरकारी अधिकाऱ्यांनी या योजनेला अनप्रॉडक्टिव्ह म्हटल्याचा उल्लेख करत त्यावर जोरदार प्रतिवाद केला.

अर्थमंत्र्यांचे अभिनंदन
मुनगंटीवार यांनी या योजनेबाबत बोलताना अर्थमंत्री तथा सरकारचे अभिनंदन केले. परंतु, विरोधकांकडून सातत्याने होणाऱ्या टीकेबाबत ते नाराज असल्याचे दिसून आले. राज्यातील 2 कोटी 52 लाख महिलांना मदत करताना सरकार 50 वेळा विचार करते, पण कर्मचाऱ्यांना पगार देताना कोणतीही चर्चा केली जात नाही. मग योजनेच्या नावावर काहींना पोटदुखी का होते? असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुनगंटीवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण देत राज्यातील स्त्री सन्मानावर भाष्य केले. जेव्हा शिवरायांना विचारले गेले की आपल्या राज्यात स्त्रीचे स्थान कुठे आहे, तेव्हा त्यांनी उत्तर दिले आमच्या घराच्या देव्हाऱ्यात. स्त्री ही फक्त गृहिणी नाही, ती समाजाची खरी ताकद आहे. पण काही जणांना महिलांसाठी काहीही करणं पचत नाही. असे ते म्हणाले.
Sanjay Deshmukh : दिल्लीच्या वाऱ्यात विदर्भाच्या परिवर्तनाचा गंध
विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर
विरोधकांनी लाडकी बहीण योजनेला उद्देशून टीका करत अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, मुनगंटीवार यांनी हे आरोप फेटाळून लावत देशाची किंवा राज्याची अर्थव्यवस्था खराब झालेली नाही, तर विरोधकांची मानसिक स्थिती बिघडली असल्याची टीका केली. स्त्री ही अत्यंत हुशार आणि कार्यक्षम आहे. 99 टक्के महिलांच्या नावाचा शेवटचा अक्षर ‘ए आणि आय’ असतो. कारण स्त्रीचा दर्जा पुरुषांपेक्षा निश्चितपणे मोठा आहे. असे म्हणत त्यांनी महिलांच्या कर्तृत्वावर भर दिला.