
शिरूर कासार येथे सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घराबाबत प्रशासनाने बुलडोझर चालवल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. या कारवाईवर भाजप आमदार सुरेश धस आक्रमक झाले आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात धुमाकूळ घालणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेच्या घरावर अखेर बुलडोझर फिरलाच. शिरूर कासार गावातील त्याच्या बंगल्याचा नेमका काय दोष होता? वन विभागाच्या जागेवर अनधिकृतरित्या बांधलेल्या या घरावर कारवाई करण्यात आली, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, या कारवाईचा वेग इतका जबरदस्त होता की भाजप आमदार सुरेश धस यांनी थेट प्रशासनालाच जाब विचारायचं ठरवलंय.
सतीश भोसले म्हणजे सुरेश धस यांचा कट्टर कार्यकर्ता. मग असं काय घडलं की त्याच्या घरावर एवढ्या घाईने बुलडोझर चालवण्यात आला? हे नेमकं सरकारी भूमिकेचं प्रकरण आहे की राजकीय कट-कारस्थान? सुरेश धस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, ‘ही कारवाई एवढ्या तातडीनं का केली याचा मला प्रश्न आहे’

राजकारणात खळबळ
संपूर्ण घटनेमागे वेगळाच अजेंडा आहे का? काही लोकांचं म्हणणं की ही जमीन वन विभागाची आहे, तर काही जण म्हणतायत की ती अधिकृतपणे वाटप झालेली आहे. खरं काय, खोटं काय हे शोधण्याची जबाबदारी आता धस यांनी घेतली आहे.कलेक्टर आणि वन विभागाला यावर उत्तर द्यावंच लागेल, असं त्यांनी ठणकावलं आहे.
याच पार्श्वभूमीवर, गाजलेला गुंड कार्यकर्ता सतीश भोसले अखेर प्रयागराज येथून पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर त्याच्या मारहाणीचे व्हिडीओ व्हायरल झाले आणि लगेचच तो भूमिगत झाला. पण पोलीसही काही कमी नव्हते.
Sudhir Mungantiwar : ‘डोन्ट बी क्युरियस’, जनताही घेत नाही काँग्रेसला सिरीयस
विरोधक आक्रमक
विरोधकांनी या कारवाईवरून सरकारवर धडाधड तोंडसुख घेतलंय. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावरून थेट लक्ष्य करत घणाघाती आरोप केले आहेत. पोलिसांना सोयीस्कर गुन्हेगार सापडतात, पण गैरसोयीचे मात्र कधीच सापडत नाहीत असा हल्लाबोल करत त्यांनी सरकारची पोलखोल केली हाती.
इतकंच नाही, तर त्यांनी टोमणा मारत म्हटलंय, ‘आकांचा आका सापडला, आता खोक्याचा बोका शोधा’ यावरूनच स्पष्ट होतं की, सतीश भोसले प्रकरण आता सोप्पं राहिलेलं नाही. सरकारवर वाढणारा विरोधकांचा ताण आणि बुलडोझरच्या राजकारणात वाढत चाललेला तणाव यामुळे या प्रकरणाचा पुढचा अध्याय अजून रंगतदार होणार, हे नक्की.