महाराष्ट्र

Nagpur Zilla Parishad : तंत्रज्ञानाच्या दिशेने दमदार पाऊल

Budget Session : जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये एआयची भर

Author

आगामी आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रकात चार कोटींची भर पडली आहे. तंत्रज्ञान-सक्षम प्रशासन आणि नव्या योजनांमुळे जिल्हा विकासाला नवा वेग मिळणार आहे.

नागपूर जिल्हा परिषदेच्या आगामी आर्थिक वर्ष 2025 – 26च्या अंदाजपत्रकात तब्बल चार कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी हे बजेट प्रशासक राजवटीच्या अंतर्गत सादर केले आहे. सध्याचे प्रस्तावित बजेट 46 कोटींपेक्षा जास्त असून, मुद्रांक शुल्क वाढल्यास पन्नास कोटींपेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे.

यंदाच्या बजेटमध्ये विकासात्मक योजनांना विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या साहाय्याने आधुनिक यंत्रणांचा विकास, डिजिटल प्रशासनाच्या माध्यमातून गतीमान कार्यपद्धती, तसेच शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास क्षेत्रात नाविन्यपूर्ण योजना राबवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

Parinay Fuke : नागपुरातील बहिणींच्या पाठीशी उभा राहिला भाऊ

प्रशासनाची नवी दिशा

प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान आणि प्रभावी करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून AI चा वापर वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. डिजिटल पद्धतीने डेटाचे विश्लेषण करून निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता आणली जाणार आहे. विविध योजना आणि अनुदानांची माहिती त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केला जाणार आहे. शालेय शिक्षण विभागात एआय आधारित स्मार्ट लर्निंग प्रकल्प राबविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक प्रभावी शिक्षण मिळेल. ग्रामपंचायत स्तरावर ई-गव्हर्नन्स प्रणालीला अधिक बळकटी देण्यात येणार आहे. नागरिकांना जलद आणि प्रभावी शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यावर भर असेल.

पायाभूत सुविधांसाठी निधी

ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी बजेटमध्ये विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. जलसंवर्धन प्रकल्प, स्वच्छता अभियान आणि कृषी क्षेत्राला चालना देणाऱ्या योजनांसाठी अधिक निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून टेली-मेडिसिन सेवा, मोबाईल हेल्थ युनिट्स आणि डिजिटल आरोग्य कार्ड योजना लागू करण्यात येणार आहे. याशिवाय, ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विशेष योजना आखण्यात आल्या आहेत. स्वयंरोजगार प्रशिक्षण, कृषी-उद्योग विकास आणि महिला बचत गटांना मदतीसाठी नव्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येईल.

नव्या योजना

नागपूर जिल्हा परिषदेच्या या नव्या बजेटमधून सर्वसमावेशक विकासाला गती मिळेल. पारंपरिक योजनांबरोबरच नवीन तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांची अंमलबजावणी हे यंदाच्या अंदाजपत्रकाचे वैशिष्ट्य आहे. विकासाच्या नव्या संधी निर्माण करणारे हे बजेट जिल्ह्यासाठी एक मोठे पाऊल ठरणार आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!