
हिंगणघाटच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. निर्णायक बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्य व केंद्र सरकारच्या मंजुरीसह जागा हस्तांतरण आणि निधी वितरण प्रक्रियेला वेग मिळाला आहे.
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी अखेर निर्णायक बैठक पार पडली. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाविद्यालयासाठी आवश्यक जागेच्या हस्तांतरणासह निधीच्या व्यवस्थापनावर ठोस निर्णय घेण्यात आले.
हिंगणघाटमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी कृषी विभागाच्या फळझाड विभागाची जागा आधीच मंजूर झाली होती. मात्र, अद्याप हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती. या संदर्भात कृषी सचिवांना जागेचे हस्तांतरण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या उभारणीला आता वेग येणार आहे.

कॅन्सर युनिटसाठी मंजुरी
महाविद्यालयासाठी राज्य व केंद्र सरकारकडून निधी मंजूर झाला आहे. तसेच लवकरच त्याचे वितरण करण्यात येणार आहे. महाविद्यालयाच्या उभारणीसाठी स्वतंत्र ग्रीन फिल्ड प्रकल्प म्हणून त्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे स्वतंत्र इमारतीसह आवश्यक सुविधा पुरविण्यात येणार आहेत. आमदार समीर कुणावार यांनी या प्रकल्पासाठी विशेष पाठपुरावा केला होता, त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंजुरी दिली. महाविद्यालयाच्या आराखड्यात कॅन्सर युनिटचा समावेश करण्याचा प्रस्ताव आमदार समीर कुणावार यांनी मांडला होता, त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने मंजुरी दिली. या बैठकीत प्रधान सचिवांनी याला अंतिम मान्यता दिली, त्यामुळे हिंगणघाटच्या वैद्यकीय महाविद्यालयात कॅन्सर रुग्णांसाठी विशेष उपचार केंद्र उभारले जाणार आहे.
महाविद्यालयाच्या कामकाजात कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष प्रशासकीय अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे महाविद्यालयाच्या बांधकाम, परवानगी आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांना गती मिळणार आहे. आमदार समीर कुणावार यांनी हा निर्णय स्वागतार्ह असल्याचे सांगितले. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी या प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. जिल्ह्यातील आरोग्यसेवा बळकट होण्यासाठी हे महाविद्यालय आणि त्यासोबत नर्सिंग कॉलेज सुरू होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार समीर कुणावार यांनी या संपूर्ण प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष देण्याचा निर्धार व्यक्त केला.
महत्त्वाकांक्षी प्रकल्प
हिंगणघाटच्या जनतेसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय ठरणार आहे. अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडला होता, मात्र आमदार समीर कुणावार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे तो प्रत्यक्षात येत आहे. वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात हिंगणघाट एक नवे केंद्र म्हणून उदयास येईल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.