चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असताना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंसक घटना घडू लागल्या आहेत. भाजपचे प्रकाश देवतळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेलंगणात केलेल्या मारहाणीमुळे खळबळ उडाली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पदाधिकारी अराजक माजवताना दिसत आहेत. याचे ताजे उदाहरण म्हणजे भाजपचे प्रकाश देवतळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तेलंगणामध्ये घडवून आणलेली धक्कादायक घटना. करीमनगर येथे सहलीला गेलेल्या काही सदस्यांना मारहाण करून त्यांना जबरदस्तीने अपहरण करण्याचा प्रकार घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
अपहरणाच्या घटनेनंतर तेलंगणा पोलिसांनी त्वरीत कारवाई करत देवतळे आणि भाजपच्या चार प्रमुख पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले. हा प्रकार उजेडात आल्यानंतर देवतळे यांनी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची भेट घेऊन निर्दोष असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे त्यांच्या राजकीय स्वार्थाचे आणि सत्ताकांक्षेचे गडद रंग आणखीनच स्पष्ट झाले.
Nagpur Curfew : दुपारी तीननंतर उपराजधानीत संचारबंदी संपुष्टात
सत्तेसाठी अराजक
गेल्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या प्रकाश देवतळे यांनी सत्ता मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असल्याचे याआधीच दिसून आले होते. पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा येथील सेवा सहकारी संस्थेमार्फत जिल्हा बँकेसाठी प्रतिनिधी पाठविण्याच्या निर्णयात आपले नाव न आल्याने त्यांनी या संस्थेच्या सभासदांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, जेव्हा हा प्रयत्न फसला, तेव्हा त्यांनी थेट हिंसेचा मार्ग अवलंबला. सत्तेची हाव आणि पक्षांतर्गत गटबाजी यामुळे देवतळे यांनी सभासदांचा पाठपुरावा करत त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. मोगरकर यांच्या नेतृत्वाखालील बारा सदस्यांची तेलंगणातील सहल हे त्यांना आपले अपयश वाटले आणि त्यांनी सूड उगवण्यासाठी मारहाण, धमक्या आणि बळजबरीचा वापर केला.
गुंडगिरीचे समर्थन
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रकाश देवतळे यांचा राजकीय प्रभाव वाढला. मात्र त्याचबरोबर त्यांची कार्यपद्धतीही अधिक आक्रमक झाली. तेलंगणातील हा प्रकार म्हणजे निवडणुकीपूर्वीचा दबाव तंत्राचा भाग असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. सदस्यांना धमकावणे, मारहाण करणे, अपहरणासारखे कृत्य करणे हे लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. ही घटना समोर आल्यानंतरही भाजपकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही, हे अधिक धक्कादायक आहे. पक्षातील वर्चस्वासाठी हिंसाचार, धमक्या आणि जबरदस्तीच्या मार्गाने सत्तेची समीकरणे बदलण्याचे प्रकार जिल्ह्यात नव्याने घडू लागले आहेत. अशा घटनांमुळे भाजपच्या प्रतिमेवर काळी छाया पडत आहे, मात्र पक्षाने अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.
Sanjay Raut : हिंदुत्त्ववाद्यांना तैमूर चालतो, पण औरंगजेबाची कबर नको
हिंसाचाराचे सावट
घडलेल्या प्रकारानंतर पोंभूर्णा तालुका आणि देवाडा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकशाही प्रक्रियेत गुंडगिरी आणि हिंसाचार आणण्याचा हा प्रकार भाजपसाठी मोठा धक्का आहे. आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीवर याचा मोठा परिणाम होणार आहे. प्रकाश देवतळे यांचे राजकीय भवितव्यही या घटनेमुळे संकटात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारण दिवसेंदिवस गुन्हेगारीकडे झुकत चालल्याचे हे स्पष्ट लक्षण आहे. लोकप्रतिनिधींची ही गुंडगिरी आणि सत्तेची हाव सामान्य जनतेसाठी धोकादायक बनत आहे. जर अशी परिस्थिती राहिली, तर जिल्ह्यात निष्पक्ष आणि लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुक या केवळ नावालाच राहतील.
