दहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर काँग्रेस आमदार साजिद खान पठाण परतले. मतदारसंघातील प्लॉट परिसरातील घाणी, कचऱ्याचे ढीग व नाल्यांची तातडीने सफाई करण्यासाठी अधिकारी व कंत्राटदारांना कानउघाडणी केली.
अकोला जिल्हा नाव ऐकताच डोळ्यासमोर येतात ती खड्ड्यांनी भरलेली रस्ते, पावसाळ्यात हरवलेली वीज. विकासाच्या बाबतीत हा जिल्हा नेहमीच मागे का राहतो? याला कारणीभूत ठरतात ते म्हणजे काही अनऍक्टिव्ह लोकप्रतिनिधी आणि त्यांचा ‘आले, फोटो काढले, गायब झाले’ असा कारभार. विशेषतः काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्याबाबत अकोल्यात नेहमीच अशी कुजबुज ऐकायला मिळते. साजिद खान पठाण येतात, चमकतात आणि मग अंधारात हरवतात, असा संतप्त सूर सामान्य नागरिकांपासून ते भाजपच्या कार्यकर्त्यांपर्यंत सगळीकडेच उमटतो. पण, शुक्रवारी (२२ ऑगस्ट रोजी) पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघातील सोनटक्के प्लॉट परिसरात आमदार पठाण यांनी जणू जुन्या आक्रमक नगरसेवकाच्या भूमिकेत परत येत एक आकस्मिक दौरा केला आणि थेट कचऱ्याच्या साम्राज्याला आव्हान दिले.
सोनटक्के प्लॉट परिसरात पाऊल ठेवताच आमदार पठाण यांना दिसले ते कचऱ्याचे ढीग, तुडुंब भरलेल्या नाल्या आणि दुर्गंधीचे साम्राज्य. यामुळे त्यांचा पारा चढला आणि त्यांनी तिथल्या तिथे मनपाच्या स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना बोलावून खडेबोल सुनावले. यावेळी स्थानिक नागरिकांनीही आपली खंत मांडली. कचरा घंटागाडी आठवड्यातून एकदाच येते. सफाई कर्मचारी तर बोटावर मोजण्याइतके येऊन थातूरमातूर काम करतात. हे ऐकताच आमदार पठाण यांनी कंत्राटदाराला थेट इशारा दिला, या पडीक वॉर्डात सर्व मंजूर कर्मचारी कामाला लावावेत, नाहीतर कंत्राटच रद्द करू. एवढंच नाही, तर महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही बोलावून रस्त्यावर लोंबकळणाऱ्या वायर्स आणि केबल्स तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश त्यांनी दिले.
Maharashtra : अटल सेतूवरून हरित भविष्याकडे ईव्हीचा टोलमुक्त प्रवास
भ्रष्टाचाराची उघड तपासणी
आमदार होण्यापूर्वी साजिद खान पठाण हे अकोला महानगरपालिकेत आक्रमक नगरसेवक म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्या धडाडीच्या शैलीने सामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी ते सातत्याने रस्त्यावर उतरायचे. पण आमदार झाल्यावर त्यांचा हा जोश कुठेतरी मंदावला, अशी चर्चा गेल्या काही काळापासून सुरू होती. मात्र, दहा महिन्यांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आमदार पठाण पुन्हा आपल्या जुन्या स्टाईलमध्ये परतले आहेत. सोनटक्के प्लॉटमधील या दौऱ्यात त्यांनी केवळ स्वच्छतेचा प्रश्नच हाताळला नाही, तर भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढली. कंत्राटदार आणि स्वच्छता निरीक्षक यांच्या मिलीभगत उघडकीस आणत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अकोला स्वच्छ आणि सुंदर व्हायलाच हवे, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. आमदार पठाण यांचा हा आक्रमक अवतार यापुरता थांबला नाही.
जैन समाजाच्या पर्यूषण पर्वाच्या निमित्ताने त्यांना समाजाकडून एक विशेष विनंती करण्यात आली. या काळात शहरात मांसविक्री आणि जीवहत्या होऊ नये. यावर तत्काळ प्रतिसाद देत आमदार पठाण यांनी शुक्रवारी दुपारी चार वाजता मनपाच्या सभागृहात स्वच्छता विभागाची तातडीची बैठक बोलावली. यावेळी त्यांनी मंदिर परिसरात अतिक्रमण आणि मांसविक्री रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे आदेश दिले. आगामी गणेशोत्सव आणि ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवरही त्यांनी संपूर्ण शहर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. सण-उत्सवांचा हा काळ आहे. अकोला चकचकीत दिसायलाच हवे, असे सांगत त्यांनी उपआयुक्त गीता ठाकरे, सर्व विभागप्रमुख आणि स्वच्छता निरीक्षकांना कडक सूचना दिल्या.आमदार साजिद खान पठाण यांच्या या आकस्मिक दौऱ्याने आणि आक्रमक पवित्र्याने अकोल्यातील नागरिकांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. त्यांच्या जुन्या जोशाने पुन्हा एकदा शहरातील समस्यांना भिडण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. पण प्रश्न हा आहे की, हा जोश टिकून राहील की पुन्हा एकदा अंधारात हरवेल?
Marbat Festival : नागपूरात ट्रम्पपासून पहलगामपर्यंत, बडग्यांचा सामाजिक प्रहार
