दर्यापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली असून काँग्रेसशी नाळ असलेले सलीम घाणीवाला भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून भाजपला अल्पसंख्याक समाजात नवे बळ मिळाले आहे.
दर्यापूर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा भूकंप घडवून आणणारी घटना रविवारी उलगडली. घाणीवाला ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे संचालक आणि अनेक दशकांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेले सलीम सेठ घाणीवाला यांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा हातात घेतला. त्यांच्या या प्रवेशाने काँग्रेसला जबर धक्का बसला असून भाजपच्या पायाभरणीला नवे बळ मिळाले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी मांडलेल्या ‘अंत्योदय ते प्रांत्योदय’ या तत्त्वज्ञानाशी एकरूप होत, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या ध्येयधोरणाने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्र या स्वप्नरचनेने प्रेरित होऊन घाणीवाला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. वरिष्ठ नेते बाळासाहेब वानखेडे, भाजपचे महासचिव गोपाल चंदन, श्रीराम नेहर, मनीष कोरपे आणि गोकुळ भडंगे यांच्या पुढाकाराने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
भाजपला नवे बळ
सलीम घाणीवाला हे दर्यापूर नगरपरिषदेच्या माजी उपाध्यक्षा जुबेदाबाई घाणीवाला यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या वडिलांनी, ज्येष्ठ समाजसेवक जिकरभाई घाणीवाला यांनी आयुष्यभर काँग्रेसच्या ध्येयधोरणाला निष्ठेने साथ दिली. हे घराणे काँग्रेसप्रेमी म्हणून परिचित असून स्थानिक पातळीवर त्यांच्या कार्याला नेहमीच सन्मानाची दृष्टी मिळाली आहे. मात्र बदलत्या काळाची गरज ओळखत आणि नव्या नेतृत्वाच्या विचारधारेत सामील होत सलीम घाणीवाला यांनी भाजपची वाट धरली.
घाणीवाला यांच्या प्रवेशामुळे दर्यापूरसह अमरावती जिल्ह्यातील राजकीय चित्र मोठ्या प्रमाणात बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेसला या घटनेमुळे मोठा फटका बसला असून भाजपला अल्पसंख्याक समाजात नवे दार उघडण्याची संधी निर्माण झाली आहे. येत्या काळात भाजप या भागात घाणीवाला यांच्या नेतृत्वाखाली एक भक्कम अल्पसंख्याक संघटन उभे करणार असल्याचे स्पष्ट होत आहे. यामुळे पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळ मिळेल आणि स्थानिक पातळीवरील समीकरणे बदलतील.
NMC Election : नवीन प्रभाग रचनेच्या ट्विस्टने राजकीय नेत्यांचे स्वप्न भंग
विकासाच्या राजकारणाचा मार्ग
सलीम घाणीवाला यांचा भाजप प्रवेश हा केवळ राजकीय पलटी नसून विकासाभिमुखतेचा स्वीकार मानला जात आहे. नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत त्यांनी काँग्रेसपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. विकास, सबलीकरण आणि समाजातील सर्व घटकांना समान संधी मिळावी या संकल्पनांवर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे भाजपच्या ‘सबका विश्वास’ या तिसऱ्या टप्प्यालाही मूर्त स्वरूप येईल.
सलीम घाणीवाला हे उद्योगजगत आणि समाजसेवेतील अनुभवामुळे ओळखले जातात. त्यांची संघटन कौशल्ये आणि प्रभावी संपर्कजाळे याचा लाभ भाजपला मोठ्या प्रमाणात होईल, याची खात्री पक्षनेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आगामी काळात त्यांना पक्षाकडून महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता बळकट झाली आहे. स्थानिक राजकारणात त्यांचा प्रभाव वाढवून भाजपचे ध्येय अधिक भक्कम करण्याचा पक्षाचा मानस असल्याचे दिसून येते.
