राज्य सरकार आदिवासींसाठी आरोग्यधोरण तयार करणार. हे धोरण केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय आणि वैश्विक स्तरावर उपयुक्त ठरेल, अशा देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आदिवासींच्या आरोग्याबाबत एम्स येथील तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेत झालेले तज्ज्ञांचे विचारमंथन जास्त महत्वाचे आहे. याबाबत पुढचे पाऊल म्हणून परिषदेत उपस्थित झालेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे, तज्ञांच्या सूचना याला अधोरेखित करून आरोग्य विद्यापीठ, एम्सच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनातर्फे सर्वसमावेशक आरोग्यधोरण करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. एम्स’ नागपूर येथील आयोजित आदिवासी आरोग्य परिषदेच्या समारोप समारंभात ते बोलत होते.
आदिवासींच्या आरोग्य विषयक मुलभूत प्रश्नांवर निश्चित उपाययोजनांचा आराखडा या आरोग्य धोरणात तयार करण्याच्या सूचना फडणवीस यांनी कुलगुरूंना दिल्या आहेत. हे धोरण केवळ महाराष्ट्रीय स्तरापुरते मर्यादित राहणार नाही. तर राष्ट्रीय व वैश्विक स्तरावर उपयुक्त ठरेल, असा विश्वासही देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याला महाराष्ट्र शासनातर्फे सर्वातोपरी सहकार्य केले जाईल असे त्यांनी सांगितले.
उत्तरे मिळण्यास होईल मदत
आपल्या उपजत ज्ञानावर आदिवासी समाजाने स्वतःचे अस्तित्व हजारो वर्षांपासून टिकवून ठेवले आहे. काळाच्या प्रवाहात अनेक स्थित्यंतरे झाली. मात्र आदिवासी संस्कृती टिकून राहिली. यातील मूल्य, विविध भागातील पारंपारिक आदिवासी उपचार आणि आधुनिक वैद्यकाचा एकत्रित विचार करण्यात येईल. त्याचे उपयोजन केल्यास आदिवासींच्या आरोग्यविषयक मुलभुत सुविधांवर उत्तरे प्राप्त होऊ शकणार, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आदिवासी क्षेत्रात कुपोषण, सिकलसेल आणि मलेरिया यासारखे मुलभूत प्रश्न आजही आहेत. यावर राज्य सरकार आणि केंद्र सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. अनेक योजनांना यशदेखील प्राप्त होत आहे. सिकलसेल आजाराच्या निर्मूलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याचे आवाहनही फडणवीस यांनी केले. सनफार्मा, आयसीएमआरए, बिलगेट्स फाउंडेशन यांच्या सहयोगातून आदिवासी गडचिरोली जिल्हा मलेरियामुक्त लवकरात लवकर मुक्त करण्यात येईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आदिवासी भागातील लोकांच्या आरोग्य समस्यांसाठी MUHS FIST-25 च्या यासाठी आरोग्य विद्यापीठाने व ’एम्स’ ने केलेल सहकार्य महत्वपूर्ण आहे. तरुण पिढीसाठी आदिवासींच्या आरोग्य समस्या सोडविण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून आदर्श निर्माण झाला आहे. जेणेकरुन सामाजिक काम करण्यासाठी नवीन संघ तयार होईल, असे परिषदेचे आयोजक सचिव डॉ. संजीव चौधरी यांनी सांगितले.
