मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून विदर्भातील ‘क्लेफ्ट’ विकारग्रस्त बालकांसाठी मोफत उपचार व जनजागृतीसाठी ‘महा स्माईल्स’ ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेमुळे हजारो बालकांच्या चेहऱ्यावर निरागस हास्य फुलणार आहे.
कधी कोणाच्या चेहऱ्यावरचं हसू पुसट होतं, ते एका विकारामुळे आणि कधी कुणाचं आयुष्यच बदलतं, एका मोहिमेमुळे. विदर्भातील हजारो बालकांच्या आयुष्यात हास्याची नवी पहाट घेऊन येणारी अशीच एक आगळीवेगळी आणि स्पर्श करणारी आरोग्य चळवळ आता सुरू होत आहे, ‘महा स्माईल्स’. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील दृष्टिकोनातून साकार झालेली ही विशेष मोहीम, जन्मजात दुभंगलेल्या ओठ (Cleft Lip) आणि फाटलेल्या टाळू (Cleft Palate) या विकारांवर उपचार करण्यासाठी राबवली जाणार आहे. ही केवळ वैद्यकीय मदत नव्हे, तर मुलांच्या आयुष्यात उजेड पसरवणारी सामाजिक क्रांतीच ठरणार आहे.
जन्मतः चेहऱ्यावरील संरचना अपूर्ण असणाऱ्या या विकारामुळे बालकांना खाणे, बोलणे, ऐकणे अशा अनेक मूलभूत गोष्टींमध्ये अडथळा येतो. सामाजिक नजरेचा बळी ठरलेली ही निरागस बालके, वेळीच उपचार न झाल्यास आयुष्यभर न्यूनगंडात जगतात. या विकारावर सहा ते सात टप्प्यांतील शस्त्रक्रिया करावी लागते आणि ती अत्यंत खर्चिक असते. परिणामी, ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांसाठी हा उपचार केवळ स्वप्न बनतो. पण आता हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ‘महा स्माईल्स’ हे अभियान सरकारच्या पुढाकारातून संपूर्णपणे मोफत राबवले जाणार आहे.
Gadchiroli : नक्षलवादाने हिरावले पितृत्व, आता वर्दीच्या अभिमानाने सजले हात
सामाजिक उत्तरदायित्व
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला ‘स्माईल ट्रेन इंडिया’ या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेने आणि बजाज फिनसर्वच्या शेफाली बजाज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सामाजिक उत्तरदायित्वातून ही मोहीम संपूर्ण मोफत राबवली जाणार आहे. ही सहकार्याची भावना म्हणजे शासन, संस्था आणि समाज या त्रिसूत्रीच्या एकत्रित प्रयत्नांची आदर्श नांदीच म्हणावी लागेल.
या उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ 31 जुलै रोजी सकाळी 11 ते 12.30 वाजताच्या या वेळेत नागपूरच्या स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन रुग्णालयात होणार आहे. पुढील 90 दिवसांत तीन विशेष मोबाईल व्हॅन विदर्भातील 11 जिल्ह्यांत फिरून ‘क्लेफ्ट’ विकाराविषयी जनजागृती करतील. या व्हॅनद्वारे नागरिकांना लवकर निदान, शस्त्रक्रियेची गरज, उपचाराची शिफारस आणि मोफत उपचारांसाठी नोंदणी यासारख्या गोष्टींची सविस्तर माहिती दिली जाईल. गरजूंना मोफत उपचार मिळावेत, हा या उपक्रमाचा मूळ हेतू आहे.
Nagpur : भविष्यासाठी मोबिलिटी म्हणजे प्रगतीचे विमान अन् देवाभाऊ त्याचे पायलट
अत्याधुनिक तरतुदी
विदर्भातील अकोला, नागपूर, वर्धा आणि गोंदिया येथील विविध रुग्णालयांमध्ये या विकारावर अत्याधुनिक पद्धतीने मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. केवळ शस्त्रक्रियाच नव्हे, तर फिजिओथेरपी, स्पीच थेरपी व सल्लागार सेवा यांसारख्या पूरक उपचारांचीही जोड या अभियानात देण्यात येणार आहे.
शास्त्रीय आकडेवारीनुसार, दर ७०० मुलांपैकी एका मुलामध्ये क्लेफ्ट विकार आढळतो. वेळेवर उपचार न झाल्यास बोलण्यात अडचण, कान बधिर होणे, चेहऱ्यावर विकृती राहणे आणि मानसिक त्रास अशा अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्यामुळेच या मोहिमेचा उद्देश केवळ उपचार नाही, तर समाजप्रबोधन आणि सकारात्मक दृष्टीकोन तयार करणे हा आहे.
Devendra Fadnavis : सहकार सूतगिरण्यांना ऊर्जा, उमेद आणि दिशा
त्रिसूत्री चळवळ
‘महा स्माईल्स’ मोहीम ही केवळ एका शस्त्रक्रियेची व्यवस्था नसून, ही आहे शासकीय संवेदनशीलतेची, सामाजिक सहकाराची आणि वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या प्रगतीची त्रिसूत्री चळवळ. या अभियानामुळे हजारो बालकांना नवे आयुष्य, आत्मविश्वास आणि समाजात समाविष्ट होण्याची संधी मिळणार आहे.
‘महा स्माईल्स’ ही मोहीम विदर्भातील गरजू बालकांसाठी साक्षात हसण्याची परतलेली संधी ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे स्वप्न आता हजारो कुटुंबांचे आयुष्य उजळवणार आहे. ही मोहीम म्हणजे आरोग्य, संवेदना आणि समाजहित यांचा एक अनोखा संगम.