महाराष्ट्रातील मतचोरीच्या वादात काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ज्यावर प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला प्रश्न विचारले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या मत चोरीच्या नाट्याचा तमाशा जोरदार रंगला आहे. 2024 विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार सत्तेच्या सिंहासनावर विराजमान झाली. पण काँग्रेसला आपला पराभव अजूनही पचलेला दिसत नाही. निवडणूक आयोग आणि भाजपवर सातत्याने टीकेची झोड उठवणाऱ्या काँग्रेसने आता थेट राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली मत चोरीचा महाघोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. पण या साऱ्या गदारोळात वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या या ड्राम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आंबेडकरांचा सवाल तिखट आहे, काँग्रेस खरंच निवडणूक गैरव्यवहाराविरुद्ध लढतेय, की हा फक्त जनतेच्या डोळ्यांत धूळफेकीचा खेळ आहे?
राहुल गांधींनी कथित पुराव्यांसह भाजपवर घोटाळ्याचा आरोप केला असला, तरी निवडणूक आयोगाने त्यांना सात दिवसांत शपथपत्र दाखल करण्याचा इशारा दिला आहे. पण याचवेळी आंबेडकरांनी काँग्रेसच्या मरगळलेल्या भूमिकेवर बोट ठेवले आहे. त्यांनी थेट विचारले, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांनी वारंवार गप्प का बसायचं ठरवलं? खरंच तुम्हाला निवडणुकीतला अन्याय दूर करायचाय, की हा सगळा ढोंगीपणा आहे? आंबेडकरांनी काँग्रेसला कोंडीत पकडत, त्यांच्या गप्प बसण्याच्या सवयीवर जोरदार ताशेरे ओढले आहे. आंबेडकरांनी यापूर्वीही काँग्रेसला एकत्र येऊन ईव्हीएमविरुद्ध लढण्याचे आवाहन केले होते. 17 मार्च 2024 रोजी मुंबईत झालेल्या सभेत त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकजुटीने लढण्याचे निमंत्रण दिले होते. पण काँग्रेसकडून साधा हो किंवा नाही ही ऐकायला मिळाला नाही.
NMC Election : नवीन प्रभाग रचनेच्या ट्विस्टने राजकीय नेत्यांचे स्वप्न भंग
विवादाची राजकीय दिशा
एवढेच काय, 10 ऑगस्ट 2025 रोजीही आंबेडकरांनी पुन्हा खरगे आणि गांधींना एकत्र येण्याचे आवाहन केले. पण काँग्रेसचा मौनव्रताचा पवित्रा कायम राहिला. आंबेडकरांनी तर थेट 16 जानेवारी 2025 रोजी लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला. ज्यात त्यांनी 76 लाख मतांच्या संशयास्पद वाढीवरून निवडणूक आयोगाला जाब विचारला होता. पण काँग्रेस? ती तर बघू, विचार करूच्या मूडमध्येच अडकलेली दिसली. वंचित बहुजन आघाडीने या 76 लाख मतांच्या घोटाळ्याच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पण काँग्रेसच्या नेत्यांनी यावरही मौनं सर्वं साधति असा अवलंब केला. आंबेडकरांनी काँग्रेसला खरमरीत प्रश्न विचारला, जर तुम्हाला खरंच निवडणूक निष्पक्ष करायच्या असतील, तर आमच्या प्रश्नांची उत्तरे द्या. का गप्प बसता? त्यांच्या या तिखट सवालांनी काँग्रेसच्या नेत्यांना चांगलाच घाम फोडला आहे.
महाराष्ट्रात हा मत चोरीचा वाद आता काही काळ तरी शांत होण्याची चिन्हे दिसत नाहीत. राहुल गांधींच्या आरोपांवरून सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध चांगलेच रंगले आहे. एकीकडे काँग्रेस निवडणूक आयोगावर हल्लाबोल करत आहे, तर दुसरीकडे आंबेडकरांनी काँग्रेसच्या खेळीला नाटक ठरवले आहे. या साऱ्या घडामोडींमुळे जनतेच्या मनातही प्रश्न निर्माण झाले आहेत. खरंच काँग्रेसला निवडणूक प्रक्रियेत सुधारणा हवी आहे, की हा सगळा तमाशा फक्त राजकीय पोळी भाजण्यासाठी आहे? या प्रकरणात आता पुढे काय होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आंबेडकरांच्या प्रश्नांना काँग्रेस काय उत्तर देणार? निवडणूक आयोग काय पाऊल उचलणार? या सगळ्या नाट्यात जनतेचा विश्वास कायम राहणार की नाही? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल, पण तोपर्यंत हा राजकीय तमाशा महाराष्ट्राच्या रंगमंचावर जोरदार रंग भरणार, हे नक्की.
