महाराष्ट्रातील राजकारण मत चोरीच्या आरोपांमुळे आधीच तापलेले असताना, संजय कुमार यांच्या चुकीच्या पोस्टने वातावरण अजूनच ढवळून टाकले आहे.
महाराष्ट्राच्या राजकीय रणभूमीवर 2024 विधानसभा निवडणुकीनंतर एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर मत चोरीचा गंभीर आरोप लावला. त्यातच आता सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) चे सहसंचालक संजय कुमार यांच्या एका चुकीच्या ट्विटने नाशिक आणि नागपूरच्या रामटेकमध्ये गुन्हे दाखल झाले. या प्रकरणाने राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीकेचे बाण सोडत आहेत. संजय कुमार यांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
कुमार यांच्या याचिकेवर सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या नाट्यमय घडामोडींनी सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. कुमार यांनी आपल्या याचिकेत नाशिक आणि रामटेक येथे दाखल झालेले एफआयआर रद्द करण्याची विनंती केली आहे. त्यांचे वकील म्हणाले, संजय कुमार यांनी 30 वर्षे देशासाठी प्रामाणिकपणे काम केले आहे. ते एक आदरणीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्याकडून झालेली ही चूक अनावधानाने झाली. त्यांनी तात्काळ ट्विट डिलिट करून सार्वजनिक माफी मागितली, तरीही त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. 17 ऑगस्टला कुमार यांनी काही मतदारसंघातील मतदारसंख्येत झालेल्या वाढ-घटीबाबत ट्विट केले होते.
Congress : नांनावरून विश्वास उडाल्याने महापालिकेची लढाई लढणारा सूरमा कोण?
CSDS दावा विवादित ठरला
चूक लक्षात येताच 19 ऑगस्टला त्यांनी ते ट्विट हटवले आणि माफी मागितली. पण निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी नाशिक आणि रामटेक येथे गुन्हे नोंदवले. ज्यात नव्या भारतीय न्याय संहितेतील गंभीर कलमांचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर तापलेली सुनावणी झाली. सरन्यायाधीश गवई यांनी सांगितले, सामान्यतः आम्ही अशा प्रकरणांत हस्तक्षेप करत नाही. पण तरीही न्यायालयाने नोटीस बजावत कारवाईला अंतरिम स्थगिती दिली. कुमार यांनी आपल्या याचिकेत ठासून सांगितले की, फक्त एक चुकीचे ट्विट झाल्यामुळे फोर्जरीसारखे गंभीर गुन्हे लावणे हा सत्तेचा दुरुपयोग आहे.
माझा कोणताही गुन्हेगारी हेतू नव्हता. ही केवळ निष्काळजी चूक होती, ज्यासाठी मी तात्काळ माफी मागितली. या प्रकरणाने राजकीय वर्तुळात खळबळ माजवली आहे. कारण CSDS मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा केला होता. ज्यामध्ये रामटेकचे उदाहरणही समाविष्ट होते. CSDS दाव्याने राजकारणाला नवा रंग चढला. त्यांनी असा आरोप केला होता की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे यादीतून कमी करण्यात आली. या आकडेवारीच्या आधारावरच राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर मत चोरीचा खळबळजनक आरोप लावला. पण रामटेकच्या तहसीलदारांनी CSDS दावा खोटा आणि मतदारांची दिशाभूल करणारा असल्याची तक्रार पोलिसांकडे केली. यामुळे हे प्रकरण आणखीच चिघळले.
आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत. संजय कुमार यांच्या चुकीच्या ट्विटने सुरू झालेला हा वाद महाराष्ट्राच्या राजकारणात नवा तमाशा घडवणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
