
बंजारा संस्कृतीचा भव्य वारसा आता इतिहासात नव्हे तर वास्तवात अनुभवता येणार. पोहरादेवीतील नंगारा संग्रहालयाचे दरवाजे अखेर सर्वांसाठी खुले झाले आहेत.
वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी हे बंजारा समाजाचे धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र मानले जाते. याच पवित्र स्थळी उभारण्यात आलेल्या भव्य नंगारा संग्रहालयाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडले होते. मात्र या लोकार्पणावेळी संग्रहालयातील तांत्रिक काम अपूर्ण होते. त्यामुळे सामान्य नागरिकांना प्रवेश मिळू शकला नव्हता. तब्बल सहा महिन्यांनंतर, अखेर 5 एप्रिल 2025 पासून हे संग्रहालय सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंजारा समाजाच्या घट्ट मतपेटीकडे लक्ष केंद्रित करून, तांत्रिकदृष्ट्या अपूर्ण असलेल्या या संग्रहालयाचे लोकार्पण गाजावाजा करत पार पाडण्यात आले. आता मात्र या भव्य वास्तूचे संपूर्ण काम पूर्ण झाले आहे. ते आता पर्यटकांच्या सेवेत दाखल झाले आहे.

बंजारा संस्कृतीचे दर्शन
पोहरादेवी येथील या संग्रहालयात बंजारा समाजाचा समृद्ध वारसा चलचित्र, देखावे आणि पारंपरिक संगीताद्वारे अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडण्यात आला आहे. संग्रहालयाच्या पाहणीसाठी सुमारे दोन तास लागतात. यामध्ये प्रत्येक पाहुण्यास ऑडिओ गाईड स्वरूपात हेडफोन देण्यात येतो, ज्याद्वारे तो ज्या देखाव्यासमोर उभा आहे, त्याची सखोल माहिती मिळते.
बंजारा समाजाची न्यायव्यवस्था, धार्मिक परंपरा, जीवनशैली, वेशभूषा, राजकीय वाटचाल आणि सांस्कृतिक अधिष्ठान या विविध दालनांमधून दर्शन घडते. भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, व शीख परंपरेचे देखावे धार्मिक सहिष्णुतेचे प्रभावी दर्शन घडवतात.
निवडणूकपूर्व नियोजनाचे चित्र
नंगारा संग्रहालयाची संकल्पना युती सरकारच्या काळात आकाराला आली. डिसेंबर 2018 मध्ये, 2019 मधील निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडले होते. त्या वेळीच याचे निवडणूकपूर्व महत्त्व अधोरेखित झाले होते.
2024 मधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, अपूर्ण स्थितीत असतानाही या संग्रहालयाचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सहा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आता हे केंद्र सर्वसामान्यांसाठी खुले झाले असून, राजकीय नेत्यांच्या घोषणा आणि कृतीतील विसंगती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
राजकीय व्यूहनीतीचा ठसा
नंगारा संग्रहालय हे केवळ बंजारा समाजाचे गौरवस्थान नाही तर एक सांस्कृतिक प्रेरणास्थळ देखील आहे. परंतु त्याच्या लोकार्पणासोबत जोडले गेलेले राजकीय हितसंबंध आणि निवडणूक केंद्रित धोरणे, राज्याच्या प्रशासकीय निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात.
संग्रहालय आता जरी सर्वांसाठी खुले झाले असले, तरी त्यामागचा राजकीय व्यूहचक्र आणि प्रशासनाच्या निर्णयातले प्राधान्यक्रम हे भविष्यातील सांस्कृतिक योजनांसाठी एक महत्त्वाचा धडा ठरू शकतो.