महाराष्ट्र

Yavatmal : शाळा लहान पण चमक राज्यभर

CM My School Beautiful School : शून्य सुविधांतून निर्माण झाला शिक्षणाचा हिरा

Author

एक छोटी गावशाळा… पण मोठं स्वप्न!
यवतमाळ जिल्ह्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेने अपार जिद्द, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शिक्षकांच्या समर्पणातून राज्यभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

शाळा म्हणजे केवळ इमारत नाही, ती असते संस्कारांची आणि ज्ञानाच्या प्रकाशाची जागा. याचे सर्वोत्तम उदाहरण ठरली आहे यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील सुकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. दोन शिक्षक, 41 विद्यार्थी आणि मर्यादित साधनसुविधा असतानाही या शाळेने आपल्या कार्यकर्तृत्वाने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा’ उपक्रमात प्रथम क्रमांक पटकावत तब्बल 11 लाखांचे बक्षीस मिळवून ही शाळा आज शिक्षणाच्या क्षेत्रात दीपस्तंभ ठरली आहे.

सुकळी हे गाव मुख्य प्रवाहापासून थोडे दूर आहे. गावातील राजकारण, स्थलांतर, आणि दुर्लक्षितता यामुळे या गावातील शाळा ओस पडू लागली होती. पण 2018 मध्ये आलेल्या दोन शिक्षकांनी या चित्राला पूर्णतः कलाटणी दिली. मुख्याध्यापक अमोल पालेकर आणि सहायक शिक्षक संदीप कोल्हे यांनी केवळ शिक्षकी वृत्तीने नव्हे, तर समाजसुधारकाच्या भूमिकेतून काम करत संपूर्ण शाळेचा कायापालट केला.

Amravati : गुप्त माहितीच्या आधारे एमडीची तस्करी उघड

कृतीतून दिले उत्तर

शाळेची पटसंख्या वाढवण्याचे मोठे आव्हान या शिक्षकांसमोर होते. बाहेरच्या गावात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना परत आपल्या शाळेत आणण्यासाठी त्यांनी गावकऱ्यांशी संवाद सुरू केला. गावकऱ्यांनी थेट विचारले, तुमचीच मुलं टाकाल का इथे? यावर दोन्ही शिक्षकांनी स्वतःच्या मुलांचे नाव सुकळी शाळेत घालून गावकऱ्यांना प्रत्यक्ष कृतीतून उत्तर दिले. याच निर्णयाने गावकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला. अनेकांनी आपल्या मुलांना पुन्हा गावातीलच शाळेत घालायला सुरुवात केली. याच क्षणापासून सुकळी शाळेचा उत्कर्ष सुरू झाला.

सुकळी शाळेच्या यशामागे एक सूत्र आहे गुणवत्ता. ही गुणवत्ता केवळ विद्यार्थ्यांच्या परीक्षेतील गुणांपुरती मर्यादित नाही, तर त्यांच्या समग्र व्यक्तिमत्त्व विकासातही दिसून येते. शनिवार-रविवार, सरकारी सुट्ट्या, अगदी उन्हाळी सुटीतही शाळा सुरू असते. विद्यार्थ्यांसाठी ‘इनोव्हेशन टाईम’, ‘ज्ञानरंजन’ मासिक, ‘तारीख एक गणित अनेक’, ‘फिरते मुक्त वाचनालय’, ‘ग्राहक भांडार’, ‘आनंदी मुलांची बचत बँक’, ‘रचनात्मक परसबाग’ यांसारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात.

Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या आरोग्यक्रांतीला नवी दिशा 

भाषेचा अडसर नाही

शाळेतील विद्यार्थ्यांना जर्मन, जापानी आणि इंग्रजी भाषा लिहिता आणि बोलता येते.  हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल, पण हीच सुकळी शाळेची खरी ओळख आहे. प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलांनी 22 अंकी संख्यांचे सहज वाचन करणे, हा त्यांच्या कौशल्याचा एक नमुना आहे. ‘संविधान समजून घेऊ’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानातील १७७ अनुच्छेदांचा सखोल अभ्यास केला. त्यांच्या ज्ञान आणि समजून घेण्याच्या क्षमतेने प्रभावित होऊन तत्कालीन शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी दिवसभर शाळेत वेळ घालवला आणि त्यांच्या मेहनतीची प्रशंसा केली.

सुकळी शाळेचा हा यशस्वी प्रवास केवळ शिक्षकांच्या अथक प्रयत्नामुळे नाही, तर गावकऱ्यांची साथ, पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची जिद्द हे तीनही घटक तेवढेच महत्त्वाचे आहेत. शाळा व्यवस्थापन समितीचे सक्रीय योगदान आणि सर्व स्तरांवरील सहकार्यामुळेच ही शाळा एक आदर्श मॉडेल ठरली आहे. मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा उपक्रमात मिळालेले 11 लाखांचे बक्षीस हे सुकळी शाळेच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र आहे. मुख्याध्यापक अमोल पालेकर यांनी सांगितले की, हा निधी शाळेच्या भौतिक आणि शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्यात येईल. आमचा उद्देश केवळ इमारत सुशोभित करणे नसून शिक्षणाची गुणवत्ता उंचावणे हा आहे.

आज ही शाळा फक्त सुकळी गावापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर कळंब, यवतमाळ आणि आसपासच्या गावांतील विद्यार्थ्यांसाठीही आदर्श केंद्र बनली आहे. सुकळी शाळेची कहाणी हे दाखवून देते की जिथे संकल्प, समर्पण आणि सहकार्य असते. तिथे कोणतीही शाळा, कितीही लहान असली तरी मोठं यश मिळवू शकते.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!