
माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या उपस्थितीत पुण्यात FIDE Women’s Grand Prix 2025 बुद्धिबळ स्पर्धेचा भव्य समारोप पार पडला. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय महिला बुद्धिबळपटूंनी सहभाग घेत महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक क्षण घडवला.
जेव्हा राजकारणाचं मैदान असतं तेव्हा चाल महत्वाची असते. मात्र जेव्हा तीच चाल बुद्धिबळाच्या पटावर अवतरते, तेव्हा ती इतिहास घडवते. महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी अनेक डावांना चतुराईने मात दिली, असे भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके आता नव्या रूपात पुढे आले आहेत. हातात सत्ता तर आहेच, पण चालही तेजस्वी आहेच. या वेळी त्यांनी राजकीय पट सोडून बुद्धिबळाच्या खऱ्या पटावर आपली रणनीती रचली आहे. या नव्या डावाची सुरुवात झाली आहे पुण्यात. जागतिक दर्जाच्या FIDE Women’s Grand Prix 2025 निमित्ताने.
स्पर्धेच्या पाचव्या टप्प्याचा समारोप समारंभ 23 एप्रिल रोजी पुण्यात झाला. Amanora The Fern Hotels & Club येथे मोठ्या दिमाखात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात डॉ. परिणय फुके हे महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष म्हणून प्रमुख पाहुणे होते. राजकीय कोलाहलातून क्षणभर विराम घेत, डॉ. फुके यांनी बुद्धिबळ क्षेत्रातही आपली ठसठशीत छाप उमटवण्यास सुरुवात केली आहे. राजकारण आणि बुद्धिबळ दोन्ही खेळ तर्कशुद्धतेचे, संयमाचे आणि नियोजनाचे असतात. दोन्ही ठिकाणी प्याद्यांची मांडणी महत्त्वाची, असे मत फुके यांनी व्यक्त केले.

टाय-ब्रेक निर्णय
अखेरच्या डावात भारताच्या कोनेरू हम्पी हिने बल्गेरियाच्या नुरग्युल सालिमोव्हा हिच्यावर मात केली. तर दुसऱ्या पटावर चीनच्या झू जिनेर हिने रशियाच्या पोलिना शुवालोवा हिला पराभूत करत रंगत वाढवली. हम्पी आणि जिनेर या दोघींनीही अंतिम फेरीनंतर प्रत्येकी सात गुण मिळवले. त्यामुळे विजेतेपदाचा निर्णय थोडा अधिक गुंतागुंतीचा झाला. टायब्रेकर गुणांच्या आधारे विजयाचा मुकुट हम्पीच्या शिरपेचात रोवला गेला. विजेतेपदासोबत पारितोषिक रक्कम आणि 117.5 ग्रँड प्रिक्स गुण या दोघींमध्ये विभागून देण्यात आले.
स्पर्धेचा पुढील आणि अखेरचा टप्पा आता ऑस्ट्रियात पुढील महिन्यात रंगणार आहे. महाराष्ट्राच्या आणि भारताच्या आशेची किरण WGM दिव्या देशमुख हिने या स्पर्धेत थेट प्रवेश मिळवून आपल्या बुद्धिबळ कौशल्याची चुणूक दाखवली. 5.5 गुण मिळवत तिने तिसऱ्या स्थानावर आपलं नाव कोरलं. तिचा खेळ संयमी, तितकाच आक्रमक होताहे तिसरे स्थान तिच्या सातत्याचे प्रतीक ठरले. महाराष्ट्र चेस असोसिएशनच्या पुढाकाराने आयोजित या जागतिक दर्जाच्या स्पर्धेत जगभरातील नामवंत महिला बुद्धिबळपटूंनी सहभाग घेतला.
Chandrashekhar Bawankule : सीमेपलीकडील हल्ल्यांना आता जबरदस्त प्रत्युत्तर
जागतिक स्पर्धेतील चूरस
दिव्या देशमुख हिने आपल्या घवघवीत कामगिरीने महाराष्ट्राचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उजळवले आहे. विशेष म्हणजे दिव्या देशमुख ही नागपूर शहरातील मूळ रहिवाशी आहे. दिव्या हिने नागपूरचे नाव मोठे केले आहे. 13 ते 24 एप्रिल 2025 दरम्यान या स्पर्धेचे आयोजन केल्या गेले होते. अनेक मोठमोठ्या खेळाडूंनी यामध्ये सहभाग घेतलं होता. या स्पर्धेतील अव्वल दोन खेळाडू FIDE Women’s Candidates Tournament 2026 साठी थेट पात्र ठरणार आहेत. म्हणजेच पुढील विश्व बुद्धिबळ स्पर्धेतील आव्हानकर्ती याच स्पर्धेतून ठरेल.
डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली संघटना राज्यभर बुद्धिबळ विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे. ही स्पर्धा म्हणजे फक्त स्पर्धा नाही, ती एक चळवळ आहे. महिला बुद्धिबळ उंचावण्याची, महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ नकाशावर नेण्याची, असं फुके म्हणाले. कार्यक्रमात कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर, वरिष्ठ उपाध्यक्ष अनुरुद्ध देशपांडे, मानद सरचिटणीस निरंजन गोडबोले यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. पुण्याच्या हृदयात पार पडलेल्या या स्पर्धेमुळे महाराष्ट्रातील तरुण बुद्धिबळपटूंना जागतिक स्पर्धांची चव चाखण्याची संधी मिळाली आहे.
आजच्या घडीला जेव्हा राजकारणी सामाजिक बदलासाठी विविध माध्यमांचा वापर करत आहेत, तेव्हा डॉ. फुके यांनी बुद्धिबळाच्या पटावरून एक प्रेरणादायी उदाहरण समाजासमोर ठेवले आहे. त्यांच्या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील बुद्धिबळ अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. राजकीय खेळीप्रमाणेच, त्यांनी बुद्धिबळाच्या क्षेत्रातही महत्त्वाची चाल खेळली आहे. भारतीय बुद्धिबळाच्या भविष्यासाठी ही स्पर्धा मैलाचा दगड ठरणार आहे.