राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यावर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी जोरदार प्रतिक्रिया देत त्यांच्यावर टीका केली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून चांगलाच दणका बसला आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने स्पष्ट शब्दांत राहुल गांधींना सुनावले आहे. स्वातंत्र्यसैनिकांविरुद्ध अशी भाषा सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. भविष्यात अशी पुनरावृत्ती झाल्यास न्यायालय स्वतःहून कठोर कारवाई करेल, असा इशारा देखील न्यायालयाने दिला आहे.
वक्तव्याबद्दलच्या या घडामोडीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. आता भाजपच्या ज्वालामुखीसम नेत्या चित्रा वाघ यांनी देखील राहुल गांधींवर सडेतोड आणि थेट टीका करत काँग्रेसच्या इतिहासाच्या जाणिवांवरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे.
BJP : पहलगाम हल्ल्यात हिंदू मारले गेले, अनिल देशमुख मात्र अजूनही शोधतात पुरावे
सन्मान राखण्याचा इशारा
चित्रा वाघ म्हणाल्या की, राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने आता सडेतोड उत्तर दिलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांविरुद्ध तोंडाला आलेलं बोलणाऱ्या राहुल गांधींना संविधान म्हणजे काय हे कळलं असेल. वाघ यांनी पुढे सांगितलं की, इतकी वर्ष राहुल गांधी यांचं संपूर्ण राजकारण हे फक्त आपल्या घराण्याच्या महिमेमध्येच अडकून पडलं होतं. त्यांच्या या घराणेशाहीच्या राजकारणात इतर क्रांतिकारकांचा, स्वातंत्र्यसैनिकांचा आणि स्वाभिमानी विचारांचा कायमच अपमान झाला.
चित्रा वाघ यांनी राहुल गांधींना इतिहासाचा दाखला देत सांगितलं की, तुमची आजी इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रशंसा करणारे पत्र लिहिले होते. हेच दाखवतं की, सावरकर हे संपूर्ण देशाचे आदराचे ठिकाण आहेत. महात्मा गांधी जेव्हा ब्रिटिश व्हॉईसरॉयला पत्र लिहायचे, तेव्हा युअर फेथफुल सर्व्हंट, असं लिहायचे. उद्या तुमच्या सारखीच बालबुद्धी कुणीतरी म्हणेल की गांधीजी हे ब्रिटिशांचे नोकर होते. पण गांधीजी जसे या देशाचे महात्मा आहेत, तसेच सावरकर हे देखील या देशाचे स्वातंत्र्यवीर आहेत, हे विसरू नका, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यांची चिरफाड केली.
सर्वपक्षीय श्रद्धेचा आग्रह
वाघ यांनी हेही स्पष्ट केलं की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरुंगात असताना ज्या यातना भोगल्या, जे बलिदान दिलं ते काँग्रेसच्या कधीच लक्षात आलं नाही. त्यांच्याविषयी बोलताना भान ठेवणं गरजेचं आहे. हा देश स्वातंत्र्यासाठी लढलेल्या प्रत्येक योद्ध्याचा आहे. त्यांनी ही देखील आठवण करून दिली की, देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात ज्यांनी जिवाचं सोनं केलं त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही. काँग्रेसकडून सतत इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातो. पण सत्य कधीही दबत नाही. ते आपल्या ठिकाणी उभं राहतंच.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या या सडेतोड प्रतिक्रियेने काँग्रेसच्या राजकीय भूमिकेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या योगदानावर प्रश्न उपस्थित करणं म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्यसंग्रामाच्या स्मृतींचा अपमान आहे, हेच चित्रा वाघ यांनी आपल्या प्रभावी भाषणातून दाखवून दिलं आहे. त्यांचा हा थेट प्रहार काँग्रेसला घरचा आहेर देणारा ठरला आहे. स्वातंत्र्याचा इतिहास, स्वाभिमान, आणि बलिदानाच्या यशोगाथेवर आधारलेलं हे विधान भाजपसाठी राष्ट्रीय अस्मितेचा भाग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
