
नागपूर महापालिका अतिक्रमणविरोधी कारवायांसाठी पोलिस बंदोबस्तावर दरमहा लाखो रुपये खर्च करत असताना, नागपूर पोलिसांकडेच तब्बल ३४ कोटींच्या मालमत्ता कराची थकबाकी आहे.
अतिक्रमण हटवण्यासाठी रोज धडाकेबाज कारवाया करणाऱ्या नागपूर महानगरपालिकेचे पथक, या मोहिमेसाठी नागपूर पोलिसांकडून दररोज सुरक्षा मागवत असते. पण याच पोलिस खात्याकडून मालमत्ता कराच्या स्वरूपात कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला संरक्षण देण्यासाठी सरासरी दरमहिन्याला 8 ते 10 पोलीस कर्मचारी तैनात केले जातात. सध्या ही संख्या 12 पर्यंत पोहोचली आहे. दर पोलीस कर्मचाऱ्यावर सुमारे 30 हजार रुपये दरमहा खर्च येतो.
महापालिका केवळ पोलिसांच्या बंदोबस्तासाठीच दरमहा 3 ते 4 लाख रुपये खर्च करत आहे. एकीकडे अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी महापालिकेने पोलीस बंदोबस्तासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली आहे. परंतु, या बदल्यात नागपूर शहर पोलिसांकडून त्यांच्याच इमारती, वसाहती आणि कार्यालयांचा थकित मालमत्ता कर भरला जात नाही. माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार, नागपूर पोलीस विभागाकडे तब्बल 34 कोटी 58 लाख 55 हजार 527 रुपये इतका कर थकित आहे. कर थकवणाऱ्या ठिकाणांमध्ये पोलिसांची प्रतिष्ठित ठिकाणे समाविष्ट आहेत.

बड्या अधिकार्यांचीही थकबाकी
धंतोली पोलीस ठाणे 3 लाख 39 हजार 301 रुपये, संगम ब्लॉक 2 लाख 93 हजार 403 रुपये, बाबुलखेडा व रघुजीनगर 9 लाख 82 हजार 334 रुपये, सक्करदरा झोन 7 लाख 66 हजार 605 रुपये, आणि हुडकेश्वर पोलीस ठाणे तब्बल 2 कोटींहून अधिक थकबाकीदार आहे. थकबाकीची यादी अधिकच खळबळजनक होते जेव्हा बड्या अधिकार्यांचे निवासस्थान देखील त्यात सामील असल्याचे लक्षात येते. उदाहरणार्थ, डीआयजी हाऊस, बोरगाव 8.31 कोटी रुपये, पोलीस लाईन टाकळी वसाहत 56 लाख 81 हजार 519 रुपये, आणि सर्वात मोठी थकबाकी असलेली गोरेवाडा पोलीस वसाहत तब्बल 20 कोटी 52 लाख 9 हजार 404 रुपये इतके आहे.
महापालिका ज्यांच्यासाठी सुरक्षा खर्च करत आहे, तेच पोलिस अधिकारी कर भरण्यास टाळाटाळ करीत असल्याचा विरोध आता वाढू लागला आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे, अतिक्रमण काढून टाकल्यावरही काही तासांत पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण दिसून येतं. म्हणजेच, खर्च महापालिकेचा सुरक्षा पोलिसांची आणि परिणाम मात्र शून्य. या सगळ्यात नागपूर पोलिसांचा मालमत्ता कर थकवल्याने नागरिकांच्या पैशावरच हा दुहेरी खर्च होतो आहे.
Yavatmal : शाळा झाली रणभूमी, महाराष्ट्र दिनी शिक्षकाच्या दुचाकीची होळी