
गांजा तस्करांविरोधात दुर्लक्ष केल्याप्रकरणी नागपूर पोलिसांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी तक्रारींची गंभीर दखल घेत तातडीने कारवाई केली.
नागपूरच्या मध्यवर्ती परिसरातील सीताबर्डी परिसर गेल्या काही काळापासून गांजाच्या बिनधास्त व्यापाराने हैराण होता. येथे खुलेआम चालणाऱ्या ड्रग्जच्या व्यवहारामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिक हैराण झाले होते. या अंमली जाळ्याचा कडेलोट करण्यासाठी पोलिसांकडे वारंवार तक्रारी दाखल होत होत्या. पण पोलीस प्रशासनाकडून अपेक्षित ती ठोस पावले उचलली जात नव्हती. तक्रारी वाढू लागल्याने अखेर नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी स्वतः पुढाकार घेत परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले.
सिंगल यांनी स्पष्टपणे जाहीर केले की, कोणत्याही बेकायदेशीर कृत्याला वा तस्करांना संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांना माफ केले जाणार नाही. मात्र, या स्पष्ट इशाऱ्यानंतरही सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या डीबी (गुप्त पोलिस) टीमने गांजाच्या विक्रेत्यांवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही. आठवड्याभरापूर्वीच सीताबर्डी पोलिसांनी एका दिखाव्याच्या छाप्याचे नाट्य सादर केले. या छाप्यात एकाही गांजा विक्रेत्याला अटक करण्यात आली नव्हती. ही कृती फक्त कारवाईचे नाटक ठरल्याचे उघड झाल्यावर, पोलीस आयुक्तांनी यावर तातडीने गंभीर दखल घेतली.

डीबी टीमवर कारवाई
सिंगल यांनी डीसीपी राहुल मदने यांना कठोर आदेश देत, या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केली. या निष्काळजीपणाची किंमत दोन डीबी पोलिस अधिकाऱ्यांना निलंबनाच्या रूपात चुकवावी लागली आहे. त्याचबरोबर इतर आठ पोलिस कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईनंतर शहर पोलिस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिस आयुक्तांच्या स्पष्ट आदेशानंतर त्वरित हालचाल झाली. तेलीपुरा भागात विशेष पोलिस पथकाने अचानक छापा टाकला आणि स्नेहल लखनलाल चौरसियाला गांजा विकताना रंगेहाथ अटक करण्यात आले.
चौरसिया यांच्याकडून दोन बॅगांमध्ये भरलेला गांजा जप्त करण्यात आला. एवढ्यावरच न थांबता, या कारवाईदरम्यान आणखी २३ जणांना गांजा खरेदी करताना अटक करण्यात आली आहे. या मोठ्या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी जप्त केलेल्या गांजाचे वजन आणि त्याची किंमत अजून जाहीर केलेली नसली तरी, प्राथमिक माहितीनुसार ही रक्कम लाखोंमध्ये असल्याचे समजते. या घटनेमुळे नागपूर पोलिस दलाला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी पोलिसांवरच संगमताचे आरोप केल्याने, आता विश्वास पुनःप्रस्थापित करण्याचे मोठे आव्हान पोलिस दलासमोर आहे.
Siddharth Kharat : लग्नात तलवार फिरवणाऱ्या आमदारावर कायद्याची टाच
आयुक्त सिंगल यांनी या प्रकरणात शून्य सहनशीलता धोरण अवलंबले असून, आणखी दोषींवर कारवाई होण्याची शक्यता आहे. शहरात ड्रग्ज विरोधात व्यापक मोहिम हाती घेण्याची घोषणा पोलिसांनी केली असून, भविष्यात अशा कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार आहेत.