महाराष्ट्र

Sand Mafia : तिरोड्यात महसूल अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी

Gondia : अवैध वाळू तस्करी उघडकीस

Author

तिरोडा तालुक्यात वाळू तस्करांनी महसूल अधिकाऱ्याला धमकी दिली आहे. दुसऱ्या घटनेत ट्रक-दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू झाला.

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या तस्करांनी थेट महसूल अधिकाऱ्यालाच धमकावले. वाळू माफियांच्या या बेधडक कारवायांमुळे महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महसूल अधिकारी देवेंद्र नेवारे यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलीस ठाण्यात दोन तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर वाळूने भरलेला ट्रॅक्टर जप्त करून पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.

तिरोडा तहसीलदारांनी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी विशेष पथक तयार केले आहे. याच पथकाचे सदस्य असलेले महसूल अधिकारी देवेंद्र नेवारे हे 17 मे रोजी सायंकाळी कवलेवाडा परिसरात गस्तीवर होते. त्या दरम्यान एक निळ्या रंगाचा ट्रॅक्टर (MH 35 DW 2153) त्यांना संशयास्पदरीत्या वाहतूक करताना आढळून आला. अधिकाऱ्यांनी विचारपूस केली असता चालकाकडे कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले. ट्रॅक्टर तहसील कार्यालयात नेण्याचा प्रयत्न होत असतानाच चालकाने अधिकारी नेवारे यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

वाळू माफियांचा उद्दामपणा 

घटनेनंतर महसूल अधिकारी नेवारे यांनी तिरोडा पोलिसांना तात्काळ माहिती दिली. पोलिस शिपाई कैलास ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेत ट्रॅक्टरसह आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणात आरोपी राजू मोरे (45) आणि संतोष मोरे (28) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टरमध्ये भरलेली वाळू देखील जप्त करण्यात आली आहे. यापुढे आणखी कारवाया होण्याची शक्यता आहे.

Nagpur : सिंदूरच्या सौगंधाने खापरखेडा तिरंगामय 

तिरोडा महसूल विभागांतर्गत अनेक भागांमध्ये अशा अवैध वाळू वाहतुकीच्या घटना वारंवार घडत आहेत. या तस्करांचा दबाव महसूल कर्मचाऱ्यांवर वाढत चालला आहे. शासनाने या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी देखील होत आहे.

अपघातात मृत्यू

तिरोडा तालुक्यातील विहिरगाव-बिरसी दरम्यान तुमसर-तिरोडा मार्गावर 17 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान गोंदिया जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला.

अपघात संध्याकाळी झाल्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

तिरोडा परिसरातील दोन वेगवेगळ्या घटनांनी प्रशासनाची कार्यशैली आणि सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. एकीकडे वाळू माफियांचा वाढता दबाव महसूल अधिकाऱ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करत आहे, तर दुसरीकडे रस्ते अपघातांमुळे निष्पाप नागरिकांचा जीव जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिस विभाग यांनी या घटनांचा तपास करून ठोस उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!