
अकोल्यातील शिवसेना शिंदे गटात सध्या अंतर्गत बंडखोरीचे वादळ उठले आहे. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्याविरोधात कार्यकर्ते आक्रमक झाले असून, “बाजोरिया हटाव”ची मोहिम उघडपणे सुरू झाली आहे.
अकोल्याच्या राजकारणात सध्या प्रचंड खळबळ उडाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष रणनिती आखत असताना, शिवसेना शिंदे गटात मात्र अंतर्गत बंडखोरीचे वादळ उठले आहे. माजी आमदार आणि संपर्क नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी रणशिंग फुंकले असून, ‘बाजोरिया हटाव’ मोहिमेला आक्रमक स्वरूप प्राप्त झाले आहे.
अकोल्यातील आकाशवाणी केंद्राजवळील सभागृहात झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी गोपीकिशन बाजोरिया यांच्या विरोधात एकमुखी रोष व्यक्त केला. या बैठकीत बाजोरिया यांना संपर्क नेते पदावरून हटवण्याची मागणी आक्रमकपणे करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या मते, बाजोरिया यांनी संघटनेची वाट लावली असून पक्षाचे नुकसान करून स्वतःचा फायदा करून घेत आहेत.

वादाचा स्फोट
भाजपमध्ये नाराजीचे सूर अजून थंडावले नसतानाच, शिवसेनेतही अंतर्गत विसंवादाने राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. भाजपचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर आणि चंद्रशेखर पांडे गुरुजी यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर त्यांना थेट जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले. मात्र या निर्णयाबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेतल्यामुळे संघटनात असंतोषाचे वारे वाहू लागले.
बैठकीत कार्यकर्त्यांनी गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावले. बाजोरिया यांनी आपल्या खाजगी भूखंडांवर लाईट आणि रस्त्याची कामे करून निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोप करण्यात आला. बाजोरिया हे एकनाथ शिंदे यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांविषयी चुकीची माहिती देत असल्याचा दावा करण्यात आला. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण यांना बाजोरिया यांनी उघडपणे मदत केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला.
Akola Congress : पराभवाच्या कटुतेतून विजय अग्रवालांची बेताल विधानं
पैशांची मागणी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक कार्यकर्त्यांकडून पैसे उकळून त्या पैशांचा वापर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी करण्याचा गुप्त डाव आखल्याचा आरोपही करण्यात आला. बाजोरिया यांच्यावर नाराज कार्यकर्त्यांनी एकच हल्लाबोल केला. त्यांच्यावर निष्ठावान कार्यकर्त्यांना मागे सारण्याचा, दुय्यम वागणूक देण्याचा आणि फक्त आपल्या मर्जीनुसार राजकारण चालवण्याचा आरोप करण्यात आला. “जो बाजोरियांच्या निर्णयाशी सहमत नाही, त्याला बाजूला सारलं जातं” असा थेट आरोप कार्यकर्त्यांनी लावला.
Akola : भाजप, राष्ट्रवादी न सेना; लोकांचे प्रश्न कुणी गांभीर्याने घेईना
या सर्व घडामोडींमुळे अकोल्यातील शिवसेनेच्या संघटनाची पकड ढासळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बाजोरिया यांच्या कारभारामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होत असून, स्थानिक पातळीवर पक्षाचा जम बसण्याऐवजी विसंवाद आणि फुटीची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांची भूमिका काय राहणार, बाजोरिया यांच्यावरील आरोपांवर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र इतकं निश्चित आहे की, अकोल्यातील शिवसेनेच्या गोटात वादळ उठलं आहे, आणि हे वादळ निवडणुकीत कोणाला गारद करणार, हे काळच ठरवेल.