भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथेवरून सध्या देशात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ज्वाला भडकला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’सारख्या धाडसी सैनिकी कारवाईवर काँग्रेसकडून सुरू झालेल्या शंकांच्या सावल्यांना भाजपने आता चिरडून टाकलं आहे. नाना पटोले यांच्या स्फोटक वक्तव्यांनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट आक्रमक भूमिका घेत “मन आणि मेंदू भ्रष्ट झालेला नेता म्हणजे नाना पटोले”, असा कडक शब्दांत हल्ला चढवला आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोलेंच्या वक्तव्याला संतापजनक आणि भारतीय सैनिकांचा घोर अपमान असल्याचं ठामपणे म्हटलं. त्यांनी पटोलेंच्या वक्तव्याचा उद्धृत करत स्पष्ट केलं की, ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे कॉम्प्युटर गेम नाही, तर पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर तडाखेबंद कारवाई होती. या मोहिमेने भारताच्या शत्रूंना धडकी भरवली. अशा ऐतिहासिक लष्करी कारवाईची हेटाळणी म्हणजे केवळ जवानांचा नाही, तर संपूर्ण देशाचा अपमान आहे.
पुन्हा झालं सिद्ध
बावनकुळे यांचा पुढील आरोप अधिक गंभीर होता. ‘काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ’ हे वाक्य केवळ एक राजकीय आरोप नाही, तर प्रत्येकवेळी या पक्षाच्या कृतीमधून त्याची पुन्हा पुन्हा प्रचिती होत आहे आणि सिद्ध होत आहे, असं बावनकुळे म्हणाले. नाना पटोले यांनी ऑपरेशन सिंदूरवर केलेली टिप्पणी ही देशविरोधी मानसिकतेचं उदाहरण असल्याचं त्यांनी ठामपणे नमूद केलं. ज्यावेळी भारताचं लष्कर शत्रूच्या भूमीत घुसून शौर्यगाथा लिहीतं, त्याचवेळी काँग्रेस त्यावर संशय घेतं, हीच त्यांची ‘नीच मानसिकता’, असा घणाघातही त्यांनी केला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढे बोलताना म्हटलं की, नाना पटोले यांच्या बाष्कळ विधानामुळे शहीद जवानांच्या कुटुंबियांना किती वेदना झाल्या असतील. याचा या संवेदनाशून्य नेत्याला काहीच अंदाज नाही. तुम्ही राहुल गांधींसारखेच देशात असताना भारताचा अपमान करता, आणि परदेशात जाऊनही देशाला लज्जास्पद बनवता, अशी ठाम टीका त्यांनी केली.
वीर पुत्रांच्या पाठीशी
बावनकुळे यांनी काँग्रेसच्या एकूण मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलं की, ही तीच काँग्रेस आहे जी सर्जिकल स्ट्राईकवरही पुरावे मागते. सैन्याच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं ही त्यांची परंपरा आहे. त्यांनी ठामपणे सांगितलं की, देश पाहतो आहे की कोण ‘भारत मातेच्या’ वीर पुत्रांच्या पाठीशी उभं आहे, आणि कोण पाकिस्तानच्या मनोबलासाठी विधानं करतं आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’वरून सुरू झालेल्या राजकीय वादात आता भाजपने स्पष्ट भूमिका घेतली आहे. शत्रूच्या घरात घुसून लढणाऱ्या जवानांच्या शौर्याचं समर्थन न करता टीका करणं म्हणजे देशद्रोह आहे. नाना पटोले आणि काँग्रेसला टोचणारा, उघड उघड सवाल भाजपने विचारला आहे. भारताच्या वीर जवानांना गेम समजणाऱ्या मानसिकतेला देश माफ करणार नाही, असेही बावनकुळे यांनी ठणकावून सांगितले.
