महाराष्ट्र

Bhandara : शिक्षणाचा मुखवटा; कोठडीत शिक्षक, संशयाच्या खुर्चीत अध्यक्ष 

Education Scam : बोगस भरतीची वर्गवारी, ज्ञानगंगेचे पाणी आता गढूळ 

Author

राज्यात शालार्थ आयडी घोटाळ्याने शिक्षण व्यवस्थेची मुळे हादरवली आहेत. भंडाऱ्यातील विनोद शिक्षण संस्थेत बोगस आयडीद्वारे शिक्षक भरती केल्याचा प्रकार उघडकीस आला असून तिघांना अटक करण्यात आली आहे.

राज्यात सध्या शालार्थ आयडी घोटाळा चांगलाच गाजत आहे. शिक्षक भरतीसारख्या पवित्र प्रक्रियेचा बाजार मांडत काही लोकांनी बनावट शैक्षणिक पात्रता, बोगस शालार्थ आयडी आणि बनावट दस्तऐवजांच्या जोरावर शिक्षक पदे लाटली आहेत. याच धक्कादायक घोटाळ्याची एक कडी नुकतीच भंडाऱ्यात उघड झाली आहे. जिथे ‘विनोद शिक्षण संस्था’ या खासगी संस्थेच्या नावाखाली बोगस शिक्षकांची भरती झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या शिक्षण संस्थेच्या संचालकांनीच हा कट रचल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

भंडाऱ्यातील गोसे बु. (ता. पवनी) येथील विनोद हायस्कूल व कनिष्ठ कला-विज्ञान महाविद्यालय ही संस्था अलीकडच्या काळात अचानक संशयाच्या भोवऱ्यात सापडली. शिक्षणाचे नाव घेत लाखोंचा गोरखधंदा उघड करणाऱ्या या संस्थेतील मुख्य सचिव चेतक राजेश डोंगरे (वय 44), त्याचे काका व सचिव गंगाधर नत्थू डोंगरे आणि बोगस शिक्षक सदानंद कोठीराम जांगडे (वय 45) या तिघांना सदर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कटात सामील

या प्रकरणात महेंद्र म्हैसकर या मुख्य आरोपीचा हात असल्याची पुष्टी झाली असून, त्याने इतर सहकाऱ्यांच्या मदतीने बनावट शिक्षकांची नेमणूक करणारा जाळ उभा केला होता. तपासात उघड झाल्याप्रमाणे, चेतक डोंगरे हा संस्थेचा मुख्य सचिव असून त्याच्याच शिफारशीवरून 2018 मध्ये सदानंद जांगडे याला शिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले. पण आश्चर्याची बाब म्हणजे, त्याच्या नावाचा कुठलाही प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयात दाखलच नव्हता, ना त्याची नोंद आवक-जावक रजिस्टरमध्ये होती. म्हणजे अगदी हवाई पायऱ्यांवरून सरकारी जागा लाटण्याचा प्रकार इथे घडला होता.

महेंद्र म्हैसकरला अटक केल्यानंतर त्याच्याकडून अनेक संस्थांचे दस्तऐवज, फाईली, प्रस्ताव, आयडी इत्यादी जप्त करण्यात आले. त्याच वेळी विनोद शिक्षण संस्थेचा संशयास्पद अहवाल पोलिसांच्या हाती लागला. त्या आधारे सदर ठाण्याचे ठाणेदार मनीष ठाकरे आणि त्यांच्या पथकाने भंडाऱ्याला जाऊन तातडीने छापा टाकला आणि या तिघांना अटक केली. यावेळी पोलिसांना शैक्षणिक भरतीच्या नावाखाली आर्थिक घोटाळ्याचे ठोस पुरावे मिळाले आहेत.

Sanjay Rathod : नियोजनाच्या चक्रात यवतमाळच्या भाग्यरेषा फिरल्या 

डोंगरे अद्याप फरार

या संपूर्ण प्रकारात शिक्षण संस्थेच्या ७५ वर्षीय अध्यक्षा पार्वता राजेश डोंगरे यांचाही हात असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केलेली नसली तरी बोगस शिक्षकांच्या नेमणुकीचा अंतिम निर्णय त्यांच्याच संमतीने घेण्यात आला होता, असा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. त्यामुळे पुढील काही तासांत त्यांच्या अटकेची शक्यता नाकारता येत नाही.

या घटनेने संपूर्ण शैक्षणिक विश्व हादरले आहे. शिक्षकपदाची भरती ही गुणवत्तेवर आधारित असावी, असा मूलभूत नियम झुगारून काही संस्थांनी ती विक्रीयोग्य मालासारखी वाटली आहे. विद्यार्थ्यांचे भवितव्य, गुणवत्तापूर्ण शिक्षण, समाजाची शैक्षणिक घडण या सर्व गोष्टींवरच यामुळे गदा आली आहे. सदर पोलिसांचे तपास पथक आता आणखी आरोपींचा शोध घेत आहे. या प्रकरणात अनेक स्तरांवर संगनमताने गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आणखी शिक्षण संस्था, बनावट भरतीचे प्रकार व आर्थिक उलाढालींवर झडती घेण्याची शक्यता आहे.

हा प्रकरण केवळ भंडाऱ्यापुरता मर्यादित नाही. राज्यभरातील शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पडत आहे का, याचा आता पुन्हा एकदा खोलवर आढावा घेणे आवश्यक झाले आहे. अन्यथा शिक्षणसंस्था ‘विनोद’च्या नावाखाली विनोदच करत राहतील, आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याची बोळवणच होईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!