महाराष्ट्र

Eknath Shinde : भंडाऱ्यात सापडतात खरे वाघ 

Bhandara : खोटा वारसा सांगणाऱ्यांना दाखविला आरसा 

Share:

Author

भंडाऱ्यातील दौऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर तोफ डागत खरे वाघ येथेच सापडतात असा घणाघात केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीचे कौतुक करत त्यांनी जनतेच्या कणखर पाठिंब्याचे श्रेय शिवसैनिकांना दिले.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचा 25 जून रोजी भंडारा येथे दौरा आयोजित करण्यात आला होता. परंतु काही कारणास्तव हा दौरा पुढे ढकलून 28 जून रोजी ठेवण्यात आला. एकनाथ शिंदे यांच्या 28 जून रोजी पार पडलेल्या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कर्तृत्व शैलीचे कौतुक केले. यावेळी शिंदेंनी विरोधकांची चांगलीच उधळपट्टी केली. खरे वाघ पहायचे असतील तर भंडारा – पवनीत यावे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

उपमुख्यमंत्री म्हणाले की, अयोध्यामध्ये राम मंदिर बांधायचं स्वप्न हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं होतं. राम मंदिर बांधून त्यांचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलं. जम्मू काश्मीर मधून 370 हटविण्याचं काम देखील पंतप्रधानांनी केलं आहे. शिंदे पुढे म्हणाले, नरेंद्र भोंडेकर यांनी मला सांगितले होते की, लोकं आमच्यावर दात काढून हसायचे. परंतु त्या हसणाऱ्यांना त्यांचे दात घशात घालून त्यांची जागा जनतेने त्यांना दाखविली आहे, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला.

विजयाचा गुलाल उधळला

राम भक्तांवर हसणाऱ्या लोकांना महाराष्ट्रातील जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. प्रभू श्री रामचंद्रांचा दुसरा सर्वात मोठा पुतळा हा महाराष्ट्रात होत आहे, याचा सर्वांना गर्व असायला हवा, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले. तिथून प्रेरणा घ्या, ऊर्जा घ्या, विकासाची प्रेरणा आणि ऊर्जा घेऊन काम करा, असे आवाहन देखील शिंदे यांनी केले. सहा महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणुकीत नरेंद्र भोंडेकर यांना विक्रमी मतांनी भंडाऱ्यातील जनतेने विजयी केलं. त्यावेळी प्रचारादरम्यान आपण विजयाचा गुलाल उधळायला येणार, असे म्हटले होते. आज मी भंडाऱ्यातील जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे असे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

शिवसेनेला जनतेने विजयी केलं. महायुतीची सत्ता महाराष्ट्रात स्थापन करण्यासाठी जनतेने प्रचंड बहुमत आम्हाला दिल आणि विरोधकांचा बँड बाजा वाजविला, असा टोला शिंदेंनी लगावला. खोटा वारसा सांगणाऱ्यांना आरसा दाखवून घरचा रस्ता दाखविण्याचं काम जनतेने केलं आहे. त्याबद्दल जनतेचे कौतुक केले तेवढे कमीच. शिंदे पुढे म्हणाले की, खरे वाघ बघायचे असतील तर भंडारा – पवनीला जा, असे मी सर्वांना सांगत असतो.

Akola : भाजपचा गाफीलपणा आणि साजिद खान पठाण यांनी मारली बाजी

विरोधकांच्या टीकेला विकासाने उत्तर 

सगळे वाघ आज येथे उपस्थित आहेत. वाघाचं कातडं घालून लांडगा कधीच वाघ होत नाही. हे येथील वाघासारख्या जनतेने विरोधकांना विधानसभेत दाखवून दिलं आणि घरी बसणाऱ्यांना कायमचं घरीच बसवलं, असा घणाघात शिंदे यांनी केला. विरोधकांनी आम्हाला शिव्या दिल्या, आरोप केले, आमच्यावर टीका केली. दिवस-रात्र एकनाथ शिंदे – एकनाथ शिंदे करत होते. परंतु आम्ही टिकेला टिकेने उत्तर दिले नाही. आम्ही टीकेला कामातून उत्तर दिलं, हजारो कोटी मतदारसंघांना दिले. कोट्यवधींचा निधी भंडाऱ्याच्या या मतदारसंघासाठी दिला, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

शिंदे पुढे म्हणाले की, खऱ्या अर्थाने कुठेही विकास निधी देताना हात अडखळता घेतला नाही. नरेंद्र भोंडेकर आणि अशी जयस्वाल यांनी देखील सांगितलं की, जिल्हाप्रमुख, पदाधिकाऱ्यांना ताकद देण्यासाठी, विकास कामे करण्यासाठी त्यांना देखील सहकार्य केलं. हा कार्यकर्ताच आहे, जो या व्यासपीठावर बसलेल्या सर्व नेत्यांना आमदार, खासदार आणि मंत्री बनवतो. कार्यकर्त्यांशिवाय नेत्यांचे समोर जाणे शक्यच नाही. त्यांचा मार्केटिंग आणि ब्रँडिंग कार्यकर्ताच करतो आणि आपल्याला निवडून देतो. या कार्यकर्त्याला जपलं पाहिजे आणि मोठं केलं पाहिजे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!