महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : हिंदीचे जहाल इंजेक्शन शाळांमध्ये टोचण्याचा कट

Congress : हिंदी सक्तीवरून भाजपवर पुन्हा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा प्रहार

Post View : 36

Author

हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतरही विरोधकांची शासनावर जोरदार टीका टिप्पणी सुरूच आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा मराठी भाषा धोक्यात असल्याचे सांगत सरकारवर हल्ला चढविला.

हिंदी सक्ती ही केवळ भाषेची सक्ती नाही, तर बहुजन समाजाच्या ज्ञानपरंपरेवर, त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि मराठी अस्मितेवर होणारा हल्ला आहे, असा थेट आरोप महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आझाद मैदानावरील धरणे आंदोलनात केला. रेशिमबागेच्या अंधारातून निघालेल्या फतव्याचे समर्थन करत फडणवीस सरकार त्याची अंमलबजावणी करत आहे, असा घणाघाती हल्लाबोल करत सपकाळांनी हिंदी सक्तीमागील राजकीय अजेंडा स्पष्ट केला.

शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनात मराठीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यावेळी स्वतः आंदोलनात सहभागी झाले आणि त्यांनी मराठी जनतेच्या भावना ठाम शब्दांत व्यक्त केल्या. मराठी ही बंडखोर भाषा आहे. इतिहासात मोजक्या लोकांनीच ज्ञानावर एकाधिकार गाजवण्यासाठी मराठीचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. त्याच मानसिकतेच्या लोकांकडून पुन्हा एकदा ‘हिंदी’च्या आडून तोच प्रयत्न केला जातो आहे, असे ते म्हणाले.

Ashish Jaiswal : दोन दशकांची चूक दुरुस्त करायला उशीर झालाय

लढाई सुरूच

सपकाळ पुढे म्हणाले, रेशिमबागेच्या सावलीतून निघालेला ‘हिंदी सक्ती’चा फतवा फडणवीस सरकारने शाळांमध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला. परंतु जनतेचा तीव्र विरोध पाहता सरकारला दोन्ही शासन निर्णय मागे घ्यावे लागले. मात्र, ही लढाई इथेच संपलेली नाही. सरकारने आता डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. पण हे जाधव भाषा तज्ज्ञ नाहीत. ते केवळ सरकारच्या इशाऱ्यावर चालणारे रबर स्टॅम्प आहेत. सरकारला जे हवे, तेच ते शिफारसी म्हणून मांडतील. म्हणूनच आपण गाफील राहून चालणार नाही.”

या संपूर्ण घडामोडींना केवळ एक तात्कालिक घटना म्हणून न पाहता, सपकाळ यांनी ती एक सखोल योजना असल्याचे स्पष्ट केले. हा लढा फक्त दोन जीआर रद्द करण्यापुरता नाही. ही महाराष्ट्र धर्म वाचवण्याची आणि मराठी अस्मितेची लढाई आहे. आता जिल्हा-जिल्ह्यांत जाऊन जनजागृती करावी लागेल. एक सुसंगत कृती आराखडा तयार करून काँग्रेस पक्ष लोकांमध्ये जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Chandrashekhar Bawankule : काँग्रेसचा अध:पात उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळेच

भाषेवरून वाद

दरम्यान, भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरही सपकाळ यांनी सडकून टीका केली. दुबे बोलत आहेत, पण भाषा भाजपाची आहे. देशभरात भाषिक आणि प्रांतिक वाद निर्माण करून ते शत्रुत्व वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठी विरुद्ध हिंदी असा कृत्रिम संघर्ष उभा करून त्याला भारत-पाकिस्तान वादाचा रंग देण्याचा डाव रचला जातो आहे. भाजपचा हा अजेंडा अत्यंत धोकादायक आहे आणि त्याचा जोरदार विरोध झाला पाहिजे, असे ते म्हणाले.

सपकाळ यांनी स्पष्ट केले की मराठी भाषा केवळ संवादाचे साधन नसून, ती आपल्या अस्मितेची आणि संस्कृतीची ओळख आहे. हिंदी लादून ती ओळख पुसण्याचा प्रयत्न चालू आहे. पण ही लढाई आपण हार मानणारी नाही. काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीने मराठी समाजाच्या पाठीशी उभा राहणार आहे, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

आभा चव्हाण | Abha Chavhan

आभा चव्हाण | Abha Chavhan

आभा चव्हाण् यांनी आपल्या पत्रकारितेची सुरुवात द लोकहित लाइव्हपासून केली. त्यांना ऑनलाइन मीडिया आणि तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान आहे.

More Posts

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!