राहुल गांधी आणि अनेक विरोधी खासदारांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मत चोरीचे गंभीर आरोप करून मतदार पडताळणीसाठी मोठा मोर्चा काढला.
दिल्लीच्या राजकारणात पुन्हा एकदा मत चोरीचा मुद्दा स्फोटक ठरत आहे. 2024 लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतरही हा वाद शमताना दिसत नाही. काँग्रेस नेते व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर निवडणूक आयोगाच्या संगनमताने मत चोरी केल्याचा गंभीर आरोप करताच, राजकीय वातावरण तापले. हे आरोप केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादित न राहता आता थेट केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंत पोहोचले आहेत. संसदेतही त्याची झळ पोहोचली आहे. 7 ऑगस्ट 2025 रोजी, लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान, राहुल गांधींनी दिलेला 22 पानांचा, 1 तास 11 मिनिटांचा सादरीकरणाचा चार्जशीट जणू राजकीय बॉम्बच ठरला.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मत चोरी झाल्याचा पुरावा त्यात दाखवण्यात आल्याचा दावा करण्यात आला. राहुल गांधी यांच्या मते, मशीन रीडेबल मतदार यादी न देऊन निवडणूक आयोगाने भाजपसाठी निवडणूक चोरली. सोमवारी (11 ऑगस्ट रोजी) मतदार पडताळणी आणि मत चोरीच्या आरोपांवरून ३०० विरोधी खासदारांनी संसदेतून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. यात राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांच्यासह अनेक विरोधी नेते सहभागी झाले. मात्र, मोर्चा वाहतूक भवनाजवळच थांबवण्यात आला आणि सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Harshwardhan Sapkal : सत्ताधारी पक्षाने दंगा करू पथक स्थापन केले
खासदार पडले बेशुद्ध
दोन तासांच्या चौकशीनंतर त्यांची सुटका करण्यात आली. राहुल गांधी यांनी ताब्यात घेतल्यानंतर जाहीर केले, ही संविधान वाचवण्याची लढाई आहे. एक व्यक्ती, एक मत हे तत्त्व जपण्यासाठी आम्ही लढत आहोत. स्वच्छ मतदार यादीशिवाय लोकशाही वाचणार नाही. तर प्रियंका गांधींचा आरोप होता की, हे सरकार घाबरलेले, भित्रे आणि जनतेपासून दूर गेलेले आहे. मोर्चादरम्यान नाट्यमय घटना घडली. अखिलेश यादव यांनी बॅरिकेड्स पार करण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना अडवले. ते पुढे जाऊ शकले नाहीत, तेव्हा ते रस्त्यावरच बसले. प्रियंका गांधी आणि डिंपल यादवसह अनेक खासदार ‘वोट चोर गद्दी सोड’ अशी घोषणाबाजी करत होते.
दरम्यान, तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिताली बाग आणि महुआ मोईत्रा यांच्या प्रकृती बिघडली. मोर्चाच्या गडबडीत त्या बेशुद्ध पडल्या आणि राहुल गांधींसह इतर खासदारांनी त्यांना मदत केली. विरोधी पक्षांचा हा आक्रमक मोर्चा सोशल मीडियावरही जोरदार व्हायरल झाला. राहुल गांधींच्या मते, महाराष्ट्रातील निकालांनी मत चोरीचे मॉडेल सिद्ध झाले असून, हे तंत्र देशातील अनेक निवडणुकींत वापरले गेले असावे. त्यांनी कर्नाटकची मतदार यादी स्क्रीनवर दाखवून, संशयास्पद मतदारांची उदाहरणे दिली. यावर कर्नाटक निवडणूक आयोगाने लेखी तक्रार करण्यास सांगितले आहे. तथापि, दिल्ली पोलिसांचे म्हणणे वेगळे आहे. त्यांच्या मते, इंडिया ब्लॉकने मोर्चासाठी परवानगी घेतली नव्हती. त्यामुळेच, मोर्चा निवडणूक आयोगाच्या दारापर्यंत पोहोचण्यापूर्वीच अडवण्यात आला.
Parinay Fuke : गांधींच्या खोट्या आरोपांवर डॉ. फुकेंचा रिॲलिटी बॉम्ब
