नागपूरमध्ये शेतकरी नेते किशोर तिवारी यांच्या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सन्माननीय निवृत्ती देऊन नितीन गडकरींना देशाच्या नेतृत्वाची संधी द्यावी, अशी थेट मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांच्याकडे केली आहे.
नागपूरमध्ये राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला ऊत आला आहे. शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना लिहिलेल्या पत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सन्मानपूर्वक निवृत्ती देऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना देशाच्या नेतृत्वाची संधी द्यावी, अशी थेट मागणी केली आहे. या पत्रामुळे भाजपच्या अंतर्गत गटात आणि संघपरिवारात नवा खळबळजनक संवाद सुरू झाला आहे.
तिवारी यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे की, 2014 साली गडकरी यांना पंतप्रधानपद मिळण्याची संधी काही राजकीय कटकारस्थानामुळे हिरावली गेली. आजही त्याचा संदर्भ देत त्यांनी त्या काळातील अन्याय दुरुस्त करण्याची वेळ आल्याचे नमूद केले आहे. मोदींनी देशाला अनेक चांगली कामगिरी दिली असून राममंदिरापासून ते पायाभूत प्रकल्पांपर्यंत महत्त्वपूर्ण घडामोडी घडवून आणल्या, असे सांगतानाच आता नवीन नेतृत्वाची आवश्यकता असल्याचे ते ठामपणे मांडतात.
संघाच्या नात्याची आठवण
आपल्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा उल्लेख करताना किशोर तिवारींनी आपल्या कुटुंबाचे संघाशी असलेले नाते स्पष्ट केले आहे. वडील जमुनाशंकर तिवारी हे 1962 पासून पूर्णवेळ प्रचारक होते. आपल्यालाही संघटन शिबिराचा संस्कार लाभल्याचे ते नमूद करतात. त्यामुळे संघ परिवारातील एक जुनाच स्वयंसेवक म्हणून आपण ही अपेक्षा मांडत असल्याचे ते पत्रात नम्र शब्दांत लिहितात.
किशोर तिवारींनी सांगितले की, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्षपद मिळाल्याने त्यांना सरकारमधील कामकाजाचा अनुभव आहे. मात्र मागील काही वर्षांत केंद्रीय चौकशी संस्था, ई. डी., सी. बी. आय., मोक्का यांचा अतिरेकी वापर झाला आहे. लोकशाही संस्थांवर सावली पडल्याचे सामान्य माणसात नकारात्मक संदेश गेला आहे. या प्रतिमेत बदल घडवून आणण्यासाठीच गडकरींसारख्या सर्वमान्य नेत्याला संधी देणे आवश्यक असल्याचे ते स्पष्ट करतात.
गडकरींची संयमी भूमिका
पत्रात तिवारींनी 2012 मधील घटनांचा थेट उल्लेख केला आहे. त्यावेळी काही वरिष्ठ नेत्यांनी बोगस घोटाळ्यांचे आरोप रचून नितीन गडकरींची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. परिणामी त्यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न अपूर्ण राहिले. परंतु गडकरींनी पक्ष शिस्त आणि संयम यामुळे मौन बाळगले. आजही तेव्हा सहभागी असलेले नेते जसे की लालकृष्ण अडवाणी आणि प्रकाश जावडेकर यांनी सत्य मांडावे व गडकरींना माफी मागावी, अशी अपेक्षा तिवारींनी नोंदवली आहे.
किशोर तिवारींच्या पत्रात नरेंद्र मोदींच्या कार्यकाळाचा गौरव आहे, परंतु त्याचवेळी लोकशाही प्रक्रियेवर आलेल्या शंकेच्या सावल्या दूर करण्यासाठी नेतृत्वबदल आवश्यक असल्याचेही स्पष्टपणे लिहिलेले आहे. मोदी-शहा युगाने देशाला स्थैर्य दिले, पण हुकूमशाहीची छाया दिसू लागल्याची धारणा जगभर निर्माण झाल्याने तिचा प्रतिकार करण्यासाठी नवे नेतृत्व देशासमोर आणावे, असे ते म्हणतात.
गडकरींची कार्यसम्राट म्हणून ख्याती, सर्वसमावेशक दृष्टीकोन आणि सर्व स्तरांवरील स्वीकारार्हता हे त्यांचे बलस्थान असल्याचे स्पष्ट करत, येणाऱ्या काळात गडकरींना पंतप्रधानपदाचा कार्यकाळ मिळावा, अशी त्यांची ठाम भूमिका आहे. देशाला एका सकारात्मक बदलाची गरज आहे. हा बदल गडकरींच्या नेतृत्वातून साध्य होऊ शकतो, असा विश्वास तिवारींनी सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्राद्वारे व्यक्त केला आहे.
