महाराष्ट्र युवक काँग्रेसला नव्या नेतृत्वाचा नवा श्वास मिळाला असून संघटन, संघर्ष आणि सबलीकरणाच्या दिशेने ही तरुणाई सज्ज झाली आहे. पदग्रहण सोहळ्याच्या माध्यमातून नव्या उमेदीचा आणि नव्या ध्येयांचा प्रवास सुरू झाला आहे.
महाराष्ट्र युवक काँग्रेसला नवे नेतृत्व लाभले असून या नेतृत्वाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात युवक काँग्रेसचे संघटन अधिक भक्कम करण्याची दिशा ठरली आहे. काँग्रेस पक्षातून काही लोक बाहेर पडले असले तरी याला नकारात्मकतेपेक्षा नव्या नेतृत्वाला मिळालेली संधी असेच स्वरूप आहे. विधानसभेतील 288 जागांपैकी काँग्रेस सध्या 16 आमदारांसह मजबूत उपस्थिती राखत आहे. उर्वरित 272 जागांवर कार्य करण्याचे मोठे आव्हान आणि संधी युवक काँग्रेससमोर आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या भव्य सोहळ्यात महाराष्ट्र युवक काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांनी पदग्रहण केले. या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश उपाध्यक्ष व वरिष्ठ नेते, आमदार तसेच कर्नाटक युवक काँग्रेसचे अध्यक्ष व अनेक मान्यवर उपस्थित होते.
Devendra Fadnavis : नागपूर-चंद्रपूरच्या प्रगतीला मिळाली उंच भरारी
बळकटी देण्याची दिशा
पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने युवक काँग्रेससाठी नवे ध्येय आणि दिशा निश्चित झाली आहे. पक्षाच्या विचारधारेचे राज्यभर प्रसार–प्रचारासोबतच जनतेच्या प्रश्नांवर ठाम संघर्ष करण्याची जबाबदारी युवक काँग्रेसवर आहे. सामाजिक न्याय, समानता आणि सर्वसमावेशक विकास यांचा विचार अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचवून त्यांचे संघटन उभारण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूक लक्षात घेऊन युवक काँग्रेसला प्रत्येक गाव, प्रत्येक बुथपर्यंत पोहोचवण्याचे आव्हान समोर आहे. संघटनात्मक ताकद वाढवून थेट व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी तसेच स्थानिक उद्योग–व्यवसायांना बळ मिळवून देणे ही युवक काँग्रेसची जबाबदारी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नव्या जबाबदारीचे ध्वजवाहक झालेल्या शिवराज मोरे यांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांना उत्साहाने प्रेरित केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अन्यायाविरोधात आवाज उठवणारी, आंदोलने करणारी आणि लोकशाहीस बळकट करणारी युवक काँग्रेसची फौज राज्यभर उभी राहणार आहे. बुथ सक्षम करा, मग दिल्ली दूर नाही, हा संदेश देत युवक काँग्रेसच्या झेंड्याखाली तरुणाई एकत्रित होणार आहे. काँग्रेसचे अनेक नेते युवक काँग्रेसच्या पायरीवरून पुढे आले आहेत. या परंपरेला पुढे नेत नवे नेतृत्व तयार करणे, संघटनेत जोमाने काम करणे आणि महाराष्ट्राच्या राजकीय प्रवासाला योग्य दिशा देणे हा युवक काँग्रेसचा संकल्प आहे.
Political Drama : मोटा भाईंचा डिसिजन म्हणजे ‘अरे, आमची नोकरी गेली’!
ज्वलंत प्रश्नांवर संघर्ष
राज्याच्या सामाजिक–राजकीय परिस्थितीत अनेक ज्वलंत प्रश्न उभे ठाकले आहेत. रोजगार, उद्योग, पायाभूत सुविधा आणि भ्रष्टाचाराविरोधातील लढाई या प्राथमिकता आहेत. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक समाजाचे लक्ष अन्य दिशेकडे वळवण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा परिस्थितीत युवक काँग्रेसच खऱ्या अर्थाने लोकांच्या प्रश्नांवर संघर्ष करून नवा पर्याय निर्माण करणार आहे. मुंबईच्या अधोगतीस कारणीभूत ठरलेल्या भ्रष्टाचाराचे पडसाद स्थानिक पातळीवर उमटत असून काँग्रेसने त्यावर कठोर आवाज उठवला आहे. हजारो कोटी रुपयांच्या निधीचा हिशेब आणि पारदर्शकतेची मागणी करून राज्यातील लोकशाही अधिक सक्षम करण्याचे ध्येय काँग्रेससमोर आहे.
