भंडारा जिल्ह्यात प्रशासकीय बदलांचा सिलसिला थांबायचं नाव घेत नाही. डॉ. संजय कोलते यांच्या बदलीने पुन्हा एकदा विकासाच्या आशांना खीळ बसली आहे.
भंडारा जिल्ह्याच्या प्रशासकीय रंगमंचावर सध्या एकच गोंधळ उडालाय. येतात एक, जातात दुसरे आणि मधेच जिल्हावासीयांचा जीव टांगणीला. 5 सप्टेंबर 2024 रोजी डॉ. संजय कोलते यांनी जिल्हाधिकारी म्हणून हजेरी लावली, पण अवघ्या 11 महिन्यांत त्यांना पॅक अपचा निरोप मिळाला. त्यांच्या जागी नंदूरबारहून सावनकुमार हे आले, पण हा आला एक, गेला एकचा खेळ भंडाऱ्यात कधी थांबणार? प्रशासकीय खुर्चीला चाकं बसली की काय, असा प्रश्न पडतोय. या बदलीच्या नाटकाने भंडाऱ्याच्या विकासाची गाडी रुळावरून घसरण्याची भीती आहे.
डॉ. कोलते यांनी तर आपल्या छोट्या पारीत चांगलाच डंका वाजवला. अॅग्रीस्टॅकच्या 84 टक्के कामाला गती देऊन त्यांनी महसूलमंत्र्यांचं कौतुक मिळवलं. महसूल सप्ताहात तर नागरिकांनी लाभांचा मेळा लावला. पण स्वातंत्र्यदिनाच्या तयारीत व्यस्त असतानाच त्यांना बदलीचा स्पीड ब्रेकर लागला. गेल्या दहा वर्षांत भंडाऱ्यातील जिल्हाधिकाऱ्यांचा कार्यकाळ म्हणजे जणू ‘एक वर्ष आणि बाय बाय’चा फॉर्म्युला! या सततच्या खुर्ची बदलामुळे भंडाऱ्याच्या प्रगतीच्या गाडीला ‘पंक्चर’ होतंय की काय, असं वाटतं.
Akola Politics : साजिद खान पठाणांच्या उत्सव प्रेमाला भाजपने दर्शवला विरोध
दशकभराचा तमाशा
भंडाऱ्याच्या प्रशासकीय इतिहासात बदलीचा बिंगो खेळायला लागलाय. 2013-15 मध्ये डॉ. माधवी खोडे, 2015-16 मध्ये धीरजकुमार, 2016-17 मध्ये डॉ. अभिजित चौधरी, 2017-18 मध्ये डॉ. सुहास दिवसे, 2018-19 मध्ये शांतनू गोयल आणि 2019 मध्ये नरेश गिते यांना तर फक्त दोन महिन्यांत एक्झिट व्हायला सांगितलं. मग 2019-20 मध्ये एम.जे. प्रदिपचंद्रन, 2020-22 मध्ये संदीप कदम, 2022-24 मध्ये डॉ. योगेश कुंभेजकर आणि आता 2024-25 मध्ये डॉ. कोलते यांची एक्झिट. हा सिलसिला पाहता भंडाऱ्यातील जिल्हाधिकारी खुर्चीला म्युझिकल चेअरचा खेळ समजा की. सततच्या या बदलांमुळे प्रशासकीय यंत्रणा आणि नागरिकांचा धीर सुटायला लागलाय.
भंडाऱ्यातील बदलीच्या नाटकामागे राजकीय ‘रिमोट कंट्रोल’ असल्याची कुजबुज आहे. अधिकारी वर्गात तर हा गॉसिपचा हॉट टॉपिक आहे. जे अधिकारी राजकीय नेत्यांच्या रिमोटला नाचत नाहीत, त्यांना ट्रान्सफर बटण दाबून बाहेरचा रस्ता दाखवला जातो, असं म्हणतात. डॉ. कोलते यांच्या बदलीमागेही असाच काहीसा रिमोटचा खेळ असल्याची चर्चा आहे. विकासाला गती देणारे आणि जनतेच्या हिताला प्राधान्य देणारे अधिकारी बदलले की, भंडाऱ्याच्या प्रगतीचा सिग्नल तुटतोय की काय, असं वाटतं.
Amol Mitkari : नीतेश राणेंच्या धार्मिक उपक्रमाच्या निमित्ताने वादाचे ढग
स्थैर्याचा ब्रेक कधी?
भंडारा जिल्ह्याच्या विकासाला खऱ्या अर्थाने टर्बो बूस्ट हवाय, पण सततच्या बदलींमुळे गाडी न्यूट्रलमध्येच अडकलीय. डॉ. कोलते यांनी दाखवलेली कार्यक्षमता आणि जनहिताची झटपट पाहता त्यांच्या बदलीने सगळ्यांना ब्रेक लागल्यासारखे वाटले. दीर्घकालीन प्रकल्पांना गती मिळावी आणि नागरिकांचा विश्वास टिकावा, यासाठी प्रशासकीय स्थैर्य हा क्लच आहे. भंडाऱ्याच्या या ट्रान्सफर तमाशाला आता पूर्णविराम लागायला हवा, म्हणजे जिल्ह्याची प्रगतीची गाडी फुल स्पीड पकडेल.
