सिद्धार्थ खरात वरातीत तलवार घेऊन चर्चेत आले होते, आता ते अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य बनले आहेत. ज्यामुळे शिक्षण क्षेत्रात नव्या क्रांतीची अपेक्षा आहे.
मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी लग्नाच्या वरातीत हातात तलवार घेऊन नाचण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. सगळीकडे त्यांचीच चर्चा रंगली. पण आता त्यांनी एका नव्या भूमिकेतून सर्वांचे लक्ष वेधले आहे. होय, मेहकरचे हे धडाडीचे आमदार आता शिक्षण क्षेत्राचे मार्गदर्शक बनले आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. ही बातमी मेहकरसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2020 अंतर्गत विधानसभा अध्यक्षांना दोन आमदारांना सिनेटवर नियुक्त करण्याचा विशेष अधिकार आहे. याच अधिकाराचा वापर करत विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी सिद्धार्थ खरात यांची निवड केली. ही नियुक्ती केवळ औपचारिक नाही, तर शिक्षण क्षेत्रात परिवर्तन घडवून आणणारी आहे. खरात यांचा शिक्षण क्षेत्राशी असलेला दृढ नाता यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. त्यांनी यापूर्वी 2015-16 मध्ये उच्च व तंत्रशिक्षण विभागात सहसचिव म्हणून काम करताना महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 तयार करण्यात मोलाची भूमिका बजावली होती. या कायद्याने राज्यातील विद्यापीठांना आधुनिक आणि रोजगाराभिमुख शिक्षणाची नवी दिशा दिली.
नव्या क्रांतीची नांदी
आता त्याच कायद्याच्या कक्षेत सिद्धार्थ खरात स्वतः सिनेट सदस्य म्हणून कार्यरत होणार आहेत. सिनेट हे विद्यापीठाचे सर्वोच्च धोरणात्मक आणि निर्णय घेणारे व्यासपीठ आहे. शिक्षण, संशोधन, कौशल्यविकास आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी धोरणे ठरवण्यात सिनेटचा थेट सहभाग असतो. खरात यांच्या या नियुक्तीमुळे शिक्षण क्षेत्रात भविष्यकालीन निर्णयांना गती मिळणार आहे. त्यांचा कायद्याचा अभ्यास, प्रशासकीय अनुभव आणि राजकीय पकड यामुळे ते विद्यापीठाच्या धोरणांना नवी दिशा देण्यास सक्षम ठरतील, यात शंका नाही.
मेहकरच्या जनतेसाठी हा क्षण अभिमानाचा आहे. सिद्धार्थ खरात यांनी राजकारण, समाजकारण आणि आता शिक्षण क्षेत्रात आपली छाप पाडली आहे. त्यांच्या या नव्या भूमिकेमुळे अमरावती विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक विकासाला चालना मिळेल, अशी आशा आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे. खरात यांच्यासारख्या कायद्याची जाण असलेल्या आणि ध्येयवादी नेत्यामुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडतील, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.
सिद्धार्थ खरात यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे. वरातीत तलवारीचा ठसका दाखवणारा हा नेता आता शिक्षणाच्या व्यासपीठावर आपली तलवार ज्ञानरुपी शस्त्र बनवून नव्या क्रांतीची नांदी करणार आहे. त्यांच्या या नियुक्तीने मेहकरच्या जनतेत उत्साह संचारला आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यात आणि विद्यापीठाला जागतिक स्तरावर नेण्यात खरात यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यांच्या कार्यकाळात शिक्षण क्षेत्रात नवे अध्याय लिहिले जातील, यात कोणतीही शंका नाही.
Eknath Shinde : फुटीरतेच्या डावाला खो देत, डीसीएमने दिली न्यायाची गर्जना
