स्मार्ट सिटी असलेल्या नागपूरमध्ये वाढत्या वाहतुकीच्या खेळखंडोबाला आणि रस्त्यावरील ट्रॅफिक गोंधळाला उत्तर देण्यासाठी आता नवीन प्रयोग राबवण्यात येत आहेत.
नागपूर, जिथे संत्र्यांचा सुवास, स्मार्ट सिटीचा अभिमान आणि मेट्रोच्या जाळ्याने विकासाची नवी गाथा लिहिली जात आहे. गगनाला भिडणाऱ्या इमारती, चकाचक रस्ते आणि आधुनिकतेची झेप घेणारी ही नगरी आता नव्या स्वप्नांचा पाठलाग करतेय. पण या चमकदार चित्राला एक काळा डाग लागलाय. तो म्हणजे वाहतुकीचा अराजक गोंधळ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गृहनगरात वाहतुकीला शिस्त लावण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण रस्त्यांवरील गोंधळ हा जणू नागपूरचा अघटित ठरलाय. चुकीच्या दिशेने धावणारी वाहने, ट्रिपल सीटवर तरुणाईच्या उड्या आणि वेगाच्या नशेत बेदरकारपणे गाड्या हाकणारे चालक. हे सगळं पाहून नागपूरकरांचे डोके गरगरायला लागलेय. अपघातांचा वाढता आलेख आणि मालमत्तेचे नुकसान यांनी हा प्रश्न आता गंभीर बनलाय.
सगळ्या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी एक खाकीधारी योद्धा पुढे सरसावला आहे. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाचे डीसीपी (ट्रॅफिक) लोहित मतानी. मतानी यांनी यापूर्वी भारी वाहने आणि बाहेरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सवर ‘नो एन्ट्री’चा कडक फर्मान काढून गाजावाजा केला होता. पण रस्त्यांवरील गोंधळ हा जणू कायमचा पाठलाग करणारा सावट. आता मात्र, मतानी यांनी नव्या जोमाने आणि सर्जनशीलतेने या आव्हानाला तोंड देण्याचा विडा उचलला आहे. त्यांचा हा नवा प्रयोग नागपूरच्या रस्त्यांना शिस्तीचा नवा सूर लावणार अशी आशा आता व्यक्त होत आहे. वाहतूक पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी नागपूरच्या रस्त्यांना नवसंजीवनी देण्याचा विडा उचलला आहे. मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या गृहनगराला खऱ्या अर्थाने सुरक्षित आणि गतिमान बनवण्यासाठी मतानी अथक परिश्रम घेत आहेत.
पर्यायी मार्गांचे नियोजन
आता त्यांनी एक पाऊल पुढे टाकत 8 सप्टेंबर 2025 पासून शहरात जड वाहनांच्या प्रवेशावर पूर्ण बंदी घातली आहे. आता फक्त रात्री 10 ते सकाळी 6 वेळेतच जड वाहनांना शहरात येण्याची मुभा असेल. नागपूरच्या रस्त्यांवरील प्रत्येक अडथळ्याचा बारकाईने अभ्यास करून या योजनेची त्यांनी अंमलबजावणी केली आहे. 2020 ते 2025 कालावधीत जड वाहनांमुळे 422 प्राणघातक अपघात झाले. ज्यात 457 जणांचा बळी गेला. याशिवाय, 279 गंभीर अपघातांमुळे 563 लोक कायमचे अपंग झाले, तर 180 किरकोळ अपघातांमुळे 247 जण जखमी झाले. हे आकडे नागपूरच्या रस्त्यांवरील धोक्याची गंभीरता दर्शवतात. या समस्येला तोंड देण्यासाठी मतानी यांनी बाह्य रिंग रोडचा वापर अनिवार्य केला आहे. अनेक ट्रक आणि ट्रेलर शहरातून थेट प्रवास करत होते. ज्यामुळे गर्दी आणि अपघात वाढत होते.
आता सर्व जड वाहनांना बाह्य रिंग रोडवरूनच वळवले जाईल. मतानी स्वतः या मार्गांचे नियोजन करताना स्थानिक व्यावसायिक आणि वाहनचालकांशी चर्चा केली, जेणेकरून हा बदल सर्वांना स्वीकारार्ह व्हावा. त्यांच्या या सहभागामुळे नागपूरकरांना या योजनेवर अधिक विश्वास वाटत आहे. वाहतूक विभागाने जड वाहनांसाठी पर्यायी मार्गांचे नियोजन केले आहे. अमरावती ते जबलपूर असो किंवा वर्धा ते चंद्रपूर, प्रत्येक मार्गासाठी स्पष्ट दिशानिर्देश जारी करण्यात आले आहेत. अमरावती-जबलपूर मार्गावरील वाहनांना गोंडखैरी टी-पॉइंट अंडरपास, खडका टोल नाका आणि शून्य समृद्धी सर्कल मार्गे जावे लागेल. तसेच, भोपाळ-छिंदवाडा मार्गावरील वाहनांना कोराडी पॉवर हाऊस आणि बाह्य रिंग रोडचा वापर करावा लागेल. याशिवाय, भारतीय अन्न महामंडळाच्या अजनी गोदाम, रेल्वे वस्तू शेड आणि कांठी रोडवरील लाल गोदाम यांसारख्या ठिकाणी सकाळी 6 ते रात्री 10 वेळेत ट्रक प्रवेशावर पूर्ण बंदी असेल.
Nirmala Sitharaman : जीएसटी सुधारणांनी स्वस्त होणार दैनंदिन जीवन
सुरक्षित रस्त्यांची आशा
लोहित मतानी यांनी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या तरतुदींनुसार हा आदेश जारी केला आहे. मतानी यांनी या नियमांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विशेष पथके तयार केली आहे. जी शहराच्या सीमांवर तैनात असतील. त्यांच्या या समन्वयाने नागपूरच्या रस्त्यांवर शिस्तबद्ध वाहतूक निर्माण होईल, अशी आशा आहे. नागपूरकर आता उत्सुकतेने वाट पाहत आहेत की, लोहित मतानी यांचा हा नवा प्रयोग शहराला खऱ्या अर्थाने गतिमान आणि सुरक्षित बनवेल का. मतानी यांचा कडक कारभार आणि जोशपूर्ण ऊर्जाने नागपूरच्या रस्त्यांना नवे वळण मिळाले आहे. शहरातील गोंधळ कमी होऊन, रस्ते अधिक सुरक्षित आणि मोकळे होतील, अशी आशा प्रत्येक नागपूरकराच्या मनात आहे. या निर्णयामुळे नागपूर खऱ्या अर्थाने स्मार्ट सिटीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकेल, यात शंका नाही.
