नेपाळमधील सोशल मीडिया बंदीविरोधात तरुणांच्या आंदोलनामुळे देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. सम्राट चौधरी यांनी यावर काँग्रेसला जबाबदार ठरवले.
नेपाळमधील सध्याच्या आगीच्या भडक्याने अवघ्या भारताचे लक्ष वेधले आहे. सोशल मीडियावर बंदी घातल्याने तिथल्या जेनझीने रस्त्यावर उतरून सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती आणि मंत्र्यांचे बंगले पेटवले गेले. तर पोलीस आणि सैन्याच्या हातातून शस्त्रे हिसकावली गेली. नेपाळच्या सत्तेच्या पायावर आता खरंच कुर्हाड कोसळली आहे. या आंदोलनाचा जोश काही कमी झालेला नाही. पण या सगळ्या गोंधळाला कारण ठरलंय दोन मिलेनियल्सनी भडकावलेलं बंड. नेपाळमधील ही आग आता भारतातही पेटली आहे. त्यातही बिहार ते महाराष्ट्रापर्यंत राजकीय नेते एकमेकांना चांगलेच धारेवर धरत आहेत. बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी नेपाळच्या या अराजकतेसाठी थेट काँग्रेसलाच दोषी ठरवलंय. पाटण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या धोरणांवर बोट ठेवत म्हटलं, जर नेपाळ भारताचा भाग असता, तर आज तिथे इतका गोंधळ झाला नसता.
काँग्रेसने शेजारील देशांना वेगळं केलं, नाहीतर नेपाळ आज शांत आणि समृद्ध असतं. चौधरींच्या या बेताल वक्तव्याने महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा पारा सातव्या मजल्यावर गेला आहे. विशेषतः काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी यावर चांगलाच राग काढला आणि भाजपला डिवचत म्हणाल्या, नेपाळ धगधगत असताना अशी बेताल वक्तव्ये करून देशाची प्रतिमा मलिन करायची? इतिहास-भूगोलाचं भानही या नेत्यांना राहिलं नाही. अशा लोकांना उपमुख्यमंत्री बनवणं हीच खरी शोकांतिका आहे. चौधरींच्या वक्तव्याने नेपाळ आणि भारताच्या ऐतिहासिक संबंधांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.
Narendra Modi : वसुधैव कुटुंबकम्च्या मंत्रातून राष्ट्रसेवेपर्यंत
नेहरूंच्या निर्णयाचा परिणाम
चौधरी यांनी म्हटले की, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या द प्रेसिडेन्शियल इयर्स या पुस्तकाचा हवाला देत सांगितलं की, 1940 दशकात नेपाळचे राजा त्रिभुवन बीर बिक्रम शाह यांनी नेपाळला भारतात विलीन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तेव्हा चीनच्या कम्युनिस्ट क्रांतीमुळे आणि तिबेटवरच्या कब्जामुळे घाबरलेल्या राजाने पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंना विनंती केली होती. पण नेहरूंनी हा प्रस्ताव फेटाळून लावला आणि नेपाळने स्वतंत्र, लोकशाही राष्ट्र म्हणून राहावं, असा युक्तिवाद केला. चौधरी यांनी याच मुद्द्याला हात घालत काँग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले, नेहरूंनी तेव्हा चुकीचा निर्णय घेतला आणि आज त्याचाच परिणाम नेपाळ भोगत आहे. पण यशोमती ठाकूर यांनी यावर चांगलाच टोमणा मारला. भाजपला इतिहासाची धूळ उडवायचीच असेल, तर त्यांनी आधी स्वतःच्या घरातली धूळ साफ करावी. परराष्ट्र धोरणावर बोलताना अक्कल आणि जबाबदारी दाखवावी लागते. पण भाजप नेते तर इतिहास विसरून फक्त राजकारण करत आहेत.
चौधरी पुढे म्हणाले की, नेपाळच्या अंतर्गत बाबींवर बेताल विधानं करणं म्हणजे भारताची आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की करणे आहे.नेपाळमधील आंदोलनाने तिथल्या राजकीय इतिहासावर आणि भारताच्या शेजारी देशांशी असलेल्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. 1946 पासून नेपाळवर राज्य करणारी राणा व्यवस्था 1951 मध्ये संपली. राजा त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली संवैधानिक राजेशाही उदयास आली. पण आज, GenZ बंडाने पुन्हा एकदा नेपाळच्या राजकीय स्थिरतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या सगळ्या गोंधळात भारतातील राजकीय नेते एकमेकांवर चिखलफेक करण्यात मग्न आहेत. चौधरींच्या वक्तव्याने काँग्रेसला टीकेचं हत्यार मिळाले आहे, तर काँग्रेसच्या संतापाने भाजपला पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्ला चढवण्याची संधी मिळाली आहे.
Nitin Gadkari : सेतुबंधन योजनेतून अमरावती पूल प्रकल्पाला गती
