महाराष्ट्रात सध्या स्थानिक निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच काँग्रेसने उपराजधानी नागपूरमध्ये युवा चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रात वारशाचे राजकारण लोकांना नवीन राहिलेले नाही. वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत मुले राजकीय मैदानात उतरतात आणि हे दृश्य इतके सामान्य झाले आहे की, ते आता नवल वाटत नाही. वडील असो वा आई, त्यांच्या राजकीय वारशाचे फायदे घेत नवीन पिढी सत्तेच्या शिड्या चढण्याचा प्रयत्न करत असते. अशातच राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होणार आहेत. प्रत्येक पक्ष आपल्या रणनीती आखण्यात व्यस्थ आहे. उमेदवार निवडण्यासाठी धडपड सुरू आहे. विशेषतः नागपूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांची तयारी जोरात आहे.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होणाऱ्या या निवडणुकीत नगरसेवकांची स्वप्ने प्रत्येकाच्या डोळ्यात चमकत आहेत. नवोदित कार्यकर्ते तिकिटाच्या आशेने उत्सुक आहेत, तर ज्येष्ठ नेते आपल्या वारसांना पुढे आणण्याच्या तयारीत आहेत.काँग्रेस पक्षही या रणधुमाळीत मागे नाही. नागपूर पश्चिमचे आमदार विकास ठाकरे हे आक्रमक नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. महायुती सत्तेत असतानाही, ते विरोधी पक्षनेता म्हणून विकासकामांसाठी निधी खेचून आणण्यात पटाईत आहेत. त्यांची ही शैली नागपूरच्या जनतेला आवडते. त्यामुळेच त्यांचा बोलबाला आहे.
वडिलांच्या पावलांवर पाऊल
आता या ठाकरेंच्या घराण्यातून एक नवा चेहरा राजकारणात पाऊल टाकत आहे. विकास ठाकरेंचे सुपुत्र केतन ठाकरे. केतन हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव आहेत. सध्या ते नागपूरच्या मैदानात उतरले आहेत. राहुल गांधींची प्रतिमा युवकांमध्ये रुजवण्यासाठी ते ‘यंग ब्रिगेड’ तयार करत आहेत. रवी भवनापासून ते शहराच्या कानाकोपऱ्यात फिरत, जनसंपर्क वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. केतन ठाकरे हे नागपूर युवक काँग्रेसमध्ये प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांची शैली उत्साही आणि आधुनिक आहे. ज्यामुळे युवकांमध्ये त्यांची फॅन फॉलोइंग वाढत आहे.
2024 विधानसभा निवडणुकीत विकास ठाकरेंनी भाजपच्या सुधाकर कोहळेंना पराभूत करून विजय मिळवला होता. त्यामुळे नागपूर पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचा प्रभाव मजबूत आहे. आता महापालिका निवडणुकीसाठी केतन ठाकरेंना संधी मिळाली तर, ते पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होऊ शकतात, असे अनेकांचे मत आहे. केतन हे केवळ वडिलांच्या वारशावर अवलंबून नाहीत. ते स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मेहनत घेत आहेत. शहरातील तरुणांशी संवाद साधत, सोशल मीडियावर सक्रिय राहत, ते काँग्रेसची नवीन पिढी तयार करत आहेत.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षातही चर्चा जोरात आहेत. पक्षाला युवा चेहऱ्यांची गरज आहे.
केतन ठाकरे हे त्यासाठी योग्य उमेदवार ठरू शकतात. नागपूर हे उपराजधानी असल्याने, येथील राजकारण राज्यस्तरीय प्रभाव टाकते. विकास ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांकडून निधी आणण्याची कला अवगत केली आहे. आता केतन हे त्याच मार्गाने पुढे जात आहेत.
