महाराष्ट्राAkolaच्या राजकीय पटलावर सध्या स्थानिक निवडणुकीने पक्षांना नवीन ताकद दिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराची मालिका सुरू आहे. राजकीय रणनीती आखण्यासाठी बैठक सत्र सातत्याने घेतली जात आहेत.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकीय मैदानात वेगळीच गडबड उडाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या जानेवारी अखेरपर्यंत निवडणूक घेण्याच्या आदेशाने सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. नेत्यांची लगबग सुरू असून, काही ठिकाणी फोडाफोडीची खेळी तर काही ठिकाणी उलथापालथीची चाल चालू आहे. अकोल्यात मात्र वंचित बहुजन आघाडीने हे सर्व दुर्लक्षित करून कार्यकर्त्यांसोबत आढावा बैठक घेतली. पक्षाला मोठा धक्का बसला असला तरी, नेत्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी स्पष्ट आदेश दिले. बहुजन, दलित, आदिवासी आणि मुस्लिम समाजातील उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला गेला.
बैठकीत पक्षाच्या नेत्यांनी गेल्या वीस वर्षांतील राजकीय उपेक्षेचा बेरंग विषय उचलला. जे आमदार आणि खासदार निवडून दिले, त्यांनी अकोल्याकडे का दुर्लक्ष केलं? वंचित बहुजनांवर टीका होत असते. पण प्रस्थापित नेत्यांना प्रश्न का विचारले जात नाहीत? असा सवाल उपस्थित करताना, पाणी, वीज, आरोग्य आणि शेतीसारख्या मूलभूत समस्या आजही प्रलंबित असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद सदस्यांना काम करताना आमदार-खासदारांच्या उपेक्षेमुळे अडचणी येत असल्याचेही नमूद केले. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असल्याचे सांगून, प्रत्येकाने मीच माझ्या सर्कलचा बाळासाहेब आंबेडकर ही भूमिका घ्यावी, असे आवाहन केले गेले.
पक्ष बळकटीवर भर
अकोल्यातील महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीला खरा धक्का बसला, तो म्हणजे काही प्रमुख नेत्यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय. 2012 आणि 2017 मध्ये सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेले बबलू जगताप यांनी पक्षाची साथ सोडली. जय महाराष्ट्र म्हणत त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने पक्षात खळबळ उडाली. हे नेते पक्षाच्या मजबूत आधारस्तंभांपैकी एक होते. त्यामुळे हा पराभव केवळ निवडणुकीचा नाही, तर वैचारिक विश्वासघाताचा वाटतो. तरीही, पक्षाने हे दुर्लक्ष करून कार्यकर्त्यांना एकजुटीने लढण्याचा ब्रीफ दिला.
जिल्हा परिषद निवडणुकीत बहुजन समाजाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यावर भर दिला जाईल, असे जाहीर केले. या बैठकीत कार्यकर्त्यांना निवडणुकीची रणनीती सविस्तर सांगितली गेली. प्रत्येक सर्कलमध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी घराघरापर्यंत पोहोचण्याचे आदेश दिले. प्रस्थापित पक्षांच्या भ्रष्टाचार आणि उपेक्षेचा मुद्दा उपस्थित करून, वंचितांच्या हक्कांसाठी लढा देण्याचे वचन घेतले. अकोल्यातील राजकीय वातावरण तापले असले तरी, वंचित बहुजन आघाडीने सभा घेऊन पक्ष बळकटीवर भर दिला. नेत्यांनी सांगितले की, धक्के येणे स्वाभाविक आहे. पण बहुजन समाजाच्या हक्कांसाठी संघर्ष चालू राहील. निवडणुकीनंतरही मूलभूत सुविधांसाठी लढा सुरू राहील, अशी खात्री कार्यकर्त्यांना दिली गेली.
