दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या पेपरफुटीविरोधी आंदोलनाला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर पाठिंबा देत विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सरकारवर जोरदार टीका केली.
New Delhi : देशभरात सातत्याने घडणाऱ्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, पर्यावरणवादी आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक तसेच अभिजित दिपके यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आपण वैयक्तिकरित्या समर्थन देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अनिल देशमुख म्हणाले की, देशभरात वारंवार होत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे. शिक्षण विभागाच्या निष्काळजी आणि सदोष कारभारामुळे विद्यार्थ्यांना मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक फटका बसत आहे. अशा गंभीर प्रश्नावर सरकारने ठोस उपाययोजना करण्याऐवजी दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला.
वांगचुक यांचे उपोषण
देशाच्या भविष्यासाठी लढणारे सोनम वांगचुक आज उपोषणाला बसले आहेत. मात्र, सरकारकडून त्यांच्या आंदोलनाची कोणतीही गंभीर दखल घेतली जात नसल्याची खंत देशमुख यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या हिताशी संबंधित हा विषय अत्यंत महत्त्वाचा असून तो केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून संपूर्ण देशाच्या भविष्याशी निगडित असल्याचे त्यांनी नमूद केले.
या आंदोलनाच्या माध्यमातून युवक, विद्यार्थी आणि पालकांच्या भावना व्यक्त होत असून शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. आंदोलनाला अधिकाधिक लोकांचा पाठिंबा मिळावा यासाठी सुरू करण्यात आलेल्या मिस्ड कॉल मोहिमेत आपण स्वतः सहभागी झालो असून नागरिकांनीही या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही, असा निर्धार व्यक्त करत देशभरातील युवकांनी या आंदोलनामागील उद्दिष्ट समजून लोकशाही मार्गाने आपला आवाज बुलंद करावा, असेही देशमुख यांनी म्हटले. शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आणि पेपरफुटी रोखण्यासाठी सरकारने तातडीने प्रभावी निर्णय घ्यावेत, अशी मागणी त्यांनी यावेळी पुन्हा केली.
