
प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एका स्त्रीचा हात असतो. अशाच कर्तबगार महिलांमुळं भंडारा-गोंदियातील नेत्यांना यशाच्या आसमंताला गवसणी घातला आली आहे.
भंडारा-गोंदिया. पूर्व विदर्भातील दोन महत्वाचे जिल्हे. या जिल्ह्यातून अनेक नेत्यांनी राजकीय आसमंतात उंच अन् यशस्वी झेप घेतली. या प्रत्येक यशस्वी नेत्याच्या त्यांच्या त्यांच्या अर्धांगिनीची भक्कम साथ मिळाली आहे. यापैकी अनेक नेते जोडीदारानं दिलेल्या साथीमुळं आमदार, खासदार व प्रसंगी मंत्रीही झालेत. यशस्वी नेत्यांमागं असलेल्या अशाच नारीशक्तींबद्दल जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या कतृत्ववान पुरुषांच्या कर्तबगार जोडीदारांना करावा तितका सलाम कमी आहे.
भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके हे अशाच एक यशस्वी नेत्यांपैकी एक. डॉ. फुके यांच्या पत्नी डॉ. परिणीता फुके या यांनी अतूट साथ लाभल्यामुळं डॉ. फुके समाजकारण अन् राजकारणात मोठी उंची गाठू शकले. डॉ. परिणीता यांनी पतीच्या खांद्याला खांदा लावत राजकीय क्षेत्रातही आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमठविला. स्थानिक स्वराज्य संस्थेतही त्या सदस्य होत्या. भाजपचे चाणक्य देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत डॉ. परिणय फुके यांनी पूर्व विदर्भात महायुतीची पाळमुळं खोलवर रोवण्याचा विडा उचलला. त्याला डॉ. परिणीता फुके यांची भक्कम साथ मिळाली. उच्च विद्याविभूषित असलेल्या डॉ. परिणीता यांनी पत्नी, माता, सून आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपली भूमिका चौफेर निभावली. पी.एचडी. झालेल्या परिणीता फुके या शिक्षण क्षेत्रातील डॉक्टर म्हणून सेवारत.

भाईजी अन् भाभीजी
राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांची गोंदिया ही होमपीच. राजकीय प्रवास करताना त्यांना पत्नी वर्षा यांचा भक्कम पाठिंबा लाभला. भाईजी केंद्र सरकारमध्ये मंत्रीही होते. त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाल्यानंतर त्यांच्या पत्नी वर्षा पटेल यांनी शैक्षणिक संस्थांची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतली. तेव्हापासून आजपर्यंत पटेल यांच्या शिक्षण संस्थांचा डंका पंचक्रोशित गाजत आहे. शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर या स्त्रीरोग तज्ज्ञ. एका महिलेची वेदना काय असते याची परिपूर्ण जाणीव त्यांना आहे. एक स्त्री आणि डॉक्टर म्हणून वैद्यकीय क्षेत्राची जबाबदारी सांभाळत त्यांनी आमदार भोंडेकर यांना साथ दिली. त्यामुळंच भोंडेकरांना राजकीय क्षेत्रातील अनेक ऑपरेशन सक्सेस करता आलेत.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांच्या पत्नी प्रांजली या देखील डॉक्टरच. भंडाऱ्यातील लोकसभा निवडणुकीत पडोळे यांनी विजय मिळाविला. आयुर्वेद तज्ज्ञ असलेल्या प्रांजली यांनी प्रशांत पडोळे यांच्या विरोधकांचे असे पंचकर्म केलं की सगळे ‘चारों खाने चित’ झालेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे हे देखील अजितदादांच्या टीमचे विश्वासू सहकारी. आमदार जितके साधे तितक्यात त्यांच्या सौभाग्यवतीही साध्या. रंजिता कारेमोरे हे त्यांचं नाव. आमदार कारेमोरे यांच्या प्रचारातही त्यांनी जोमानं सहभाग घेतला.
नानांना बेजोड साथ
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या पत्नी मंगला या गृहिणी. शेतकरी कुटुंबातील असलेल्या पटोले यांच्या घरातील प्रत्येकाची नाळ आजही काळ्या मातीशी जोडलेली. नाना पटोले यांच्या प्रत्येक कार्यात मंगला पटोले यांची साथ असतेच. साधा, सोज्वळ स्वभाव ही मंगला पटोले यांची जमेची बाजू. अस्सल वऱ्हाडी बाणा जपत मंगला पडोळे यांनी नेहमीच नानांचा खऱ्या अर्थाने ‘आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ याची जाणीव करून दिली. भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे हे देखील भंडारा-गोंदियातील दिग्गज नेत्यांपैकी एक. शुभांगी मेंढे यांच्यावरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचे संस्कार खोलवर रूजलेले. सुनील मेंढे हे देखील रामभक्त. कारसेवेतही त्यांनी सहभाग घेतला. माता सीतेनं श्रीरामांना प्रत्येक पावलावर साथ दिली. त्याच श्रीरामाचे मेंढे कुटुंब भक्त. त्यामुळं माता सीतेचा आदर्श घेत शुभांगी मेंढे यांनीही आपल्या पतीला वेळोवेळी साथ दिली. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील अशा या कर्तबगार नारीशक्तीची परिपूर्ण साथ मिळाल्यानंच या जिल्ह्यातून दिग्गज नेत्यांची फळी घडली, असं म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही.