पंजाबमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मोगा जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांची अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली आहे. हा हल्ला इतका गंभीर होता की घटनास्थळीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामागे खलिस्तानी समर्थकांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण पंजाबमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात आणि विशेषतः शिवसेना शिंदे गटात संतापाचा सूर आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, थेट पंजाब सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटद्वारे मंगतराम मंगा यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहे. पंजाब सरकारच्या निष्क्रीय कारभारावर कठोर शब्दांत टीका केली आहे.
संतप्त प्रतिक्रिया
हत्येच्या या अमानुष घटनेवर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “पंजाब राज्यातील मोगा येथे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांची खलिस्तानी समर्थकांनी खुलेआम गोळ्या झाडून हत्या केली आहे. ही केवळ दु:खद नाही, तर अत्यंत गंभीर व काळजाचा ठाव घेणारी घटना आहे. पंजाबमधील आप सरकारची कुचकामी यंत्रणा यामुळे समोर आली आहे. शिवसैनिकावर अशी निर्लज्ज हत्या घडते आणि सरकार गप्प बसते, हे अशोभनीय आहे.”
शिंदे यांनी पुढे स्पष्ट केले की, “या कृत्यातील दोषींना तात्काळ शोधून कठोर शिक्षा व्हावी, ही आमची स्पष्ट मागणी आहे. पंजाबमधील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे आणि आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो.”
आर्थिक मदतीची घोषणा
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मंगतराम मंगा यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची तातडीने आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणाही शिंदे यांनी यावेळी केली. “हिंदुत्वासाठी आणि राष्ट्रभक्तीचा झेंडा खांद्यावर घेऊन चालणाऱ्या आमच्या जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांना शिवसेनेच्या वतीने मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी राहील,” असे भावनिक उद्गार शिंदे यांनी काढले.
पंजाबमध्ये या घटनेमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. खलिस्तानी समर्थकांवर थेट आरोप झाल्याने पोलिस यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांवर ताण आला आहे. अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि शिवसैनिकांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत आंदोलनाचे इशारे दिले आहेत.
मंगतराम मंगा यांची हत्या केवळ एका नेत्याचा जीव घेत नाही, तर या प्रकारामुळे पंजाबमधील वाढती अस्थिरता आणि सरकारच्या अपयशालाही उजाळा देत आहे. आता या प्रकरणातील गुन्हेगार कितपत लवकर गजाआड जातात आणि पंजाब सरकार यावर कसा प्रतिसाद देते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
