महाराष्ट्र

Maharashtra : महाविकास आघाडीतील गळती थांबता थांबेना

NCP AP : काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा नवा मुक्काम अजित पवार गटात

Post View : 42

Author

महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे दोन बडे नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले होते. अनेक बडे नेते महायुतीच्या पराभवाचे साक्षीदार ठरले. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी संपूर्ण राजकीय समीकरण बदलले. महायुतीने दणदणीत पुनरागमन करत स्पष्ट बहुमत मिळवले आणि सत्ता पुन्हा आपल्या हाती घेतली. या निवडणुकीत महायुतीने तब्बल 232 जागांवर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला तीनही पक्ष मिळून केवळ 50 जागांवर समाधान मानावे लागले.

महाविकास आघाडी या धक्क्यातून सावरते ना सावरते तोच, आता त्यांच्यासमोर आणखी मोठे संकट उभे राहिले आहे. महायुतीकडे नेत्यांचा ओढा वाढत आहे. सुरुवातीला ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, आणि आता काँग्रेसला देखील मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी थेट अजित पवार गटात प्रवेश करण्याचे ठरवले आहे.

Vijay Wadettiwar : बजरंग दल आणि विहिंपला काहीच काम उरलं नाही

पक्षप्रवेशाचा धक्का

राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे दोन मोठे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मेहुणे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि मीनल खतगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश येत्या 23 मार्च रोजी नरसी येथे पार पडणार आहे. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.

काँग्रेसला या निर्णयामुळे मोठा धक्का बसणार आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता भास्करराव पाटील खतगावकर आणि मीनल खतगावकर यांचा हा निर्णय काँग्रेससाठी आणखी एक मोठी नामुष्की ठरणार आहे.

Babasaheb Mohanrao : फडणवीस चांगले, पण मुख्यमंत्री अजित पवार झाले पाहिजेत

आव्हाने वाढली

पुढील काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे काँग्रेस आणि संपूर्ण महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे शिवसेना (ठाकरे गट) भाजप आणि शिंदे गटात विलीन होत असताना, काँग्रेसही आता फुटीच्या मार्गावर आहे. अनेक असंतुष्ट नेते आणि कार्यकर्ते नवीन राजकीय पर्याय शोधू लागले आहेत.

महायुतीने विधानसभा निवडणुकीतील विजयाच्या जोरावर आपली ताकद वाढवली आहे. त्यांच्या गोटात सतत नवीन नेत्यांची इनकमिंग सुरू आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीला मोठे संकट सोसावे लागणार आहे. या राजकीय उलथापालथीचा महाराष्ट्राच्या सत्तासमीकरणांवर काय परिणाम होईल, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!