एजाज खानच्या हाऊस अरेस्ट शोमधील एक व्हायरल क्लिप चर्चेचा विषय बनली आहे. या क्लिपमुळे आता राजकीय नेत्यांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
काही दिवसांपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अश्लील कंटेंटवर अनेक वाद निर्माण झाले आहेत. सोशल मीडियावर यावर नाराजी व्यक्त केली जात आहे. यावर राजकीय नेत्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत. पूर्वी युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. ज्यावर महाराष्ट्र सरकारकडून कारवाई करण्यात आली होती. रणवीर अल्हाबादियाने केलेल्या अश्लील विधानामुळे निर्माण झालेल्या वादानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेत सक्तीचे आदेश दिले होते.
अलाहबादीयाचा मुद्दा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आणि अखेर रणवीरला कोर्टाकडून दिलासा मिळाला. पण त्याचवेळी काही अटींसह सक्त सूचनाही देण्यात आल्या. मात्र, हे प्रकरण केवळ न्यायालयीन निर्णयावर थांबत नाही. अलाहाबादियाच्या उदाहरणावरूनही काही कंटेंट क्रिएटर्सना अद्याप शहाणपण आलेले दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कठोर पवित्र्यानंतरही अश्लीलतेचा डिजिटल ट्रेंड थांबण्याऐवजी अधिकच वाढताना दिसतोय. ज्यामुळे हा मुद्दा केवळ संस्कृतीचा नाही, तर सरकारच्या धोरणात्मक शिस्तीचा देखील मोठा प्रश्न ठरतोय.
Nagpur : अतिक्रमण हटवणाऱ्या महापालिकेवर पोलिसांच्या कराचे ओझे
संसदीय समितीचे लक्ष
बिग बॉस 7 फेम एजाज खानचा शो हाऊस अरेस्ट वादात सापडला आहे. या शोमधील एक अश्लील दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राजकीय नेत्यांनीही या अश्लील कंटेंटवर आपला निषेध व्यक्त केला आहे. या क्लिपमध्ये एजाज खान स्पर्धकांना अश्लील प्रश्न विचारतांना दिसत आहे. ज्यावर प्रेक्षकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या वादग्रस्त क्लिपनंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी या मुद्द्यावर संसद स्थायी समितीसमोर आवाज उठवला आहे.
2024 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 18 ओटीटी प्लॅटफॉर्म बंद केले होते. ज्यावर अश्लील सामग्री स्ट्रीम केली जात होती. मात्र, उल्लू आणि अल्ट बालाजी या दोन मोठ्या प्लॅटफॉर्म्सवर बंदी न घालता सरकारने त्यांना वाचवले. यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. हे ऍप्प वगळण्याबाबत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्पष्टता दिली पाहिजे, असे सांगितले जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही या मुद्द्यावर आपला विरोध दर्शवला आहे. त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अश्लीलतेला मोकळं रान देण्याचे थांबवण्याची मागणी केली आहे.
भावी पिढीचे संरक्षण
हाऊस अरेस्ट या शोच्या कंटेंटला संस्कृतीची अवहेलना आणि समाजाच्या आरोग्याशी खेळ असल्याचे चित्र वाघ म्हणाल्या. या प्रकरणामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. सरकार या वादग्रस्त ओटीटी कंटेंटवर काय कारवाई करणार? डिजिटल मीडिया वापराच्या प्रमाणात वाढ होत असताना अशा प्रकारच्या कंटेंटवर नियंत्रण ठेवणे आव्हानात्मक झाले आहे. तरीही, अनेक नेत्यांचे म्हणणे आहे की अशा कंटेंटवर कठोर उपाययोजना करणे गरजेचे आहे, जेणेकरून समाजाच्या मुलभूत मूल्यांची आणि भावी पिढीच्या मानसिकतेची रक्षा होईल. या वादाच्या प्रकाशात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा देखील चांगला चर्चेत आहे.
