महाराष्ट्र

Akola BJP : नव्या नेतृत्वाची तयारी, कौन बनेगा पदाधिकारी

Political War : अकोला भाजपमध्ये संघटनात्मक घडामोडींना वेग

Share:

Author

अकोल्यात भाजपच्या पदांसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. नव्या नावांची जोरदार चर्चा रंगली आहे. नेतृत्व बदलाच्या तयारीत पक्षाचे गट सक्रिय झाले आहे. ‘कोणता चेहरा कोणत्या पदावर?’ याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

राज्यात भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक फेरबदलांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा व शहर पातळीवरच्या विविध पदांसाठी भाजप गटांमध्ये हालचालींना वेग आला आहे. अनेक नव्या नावांची चर्चा रंगू लागली आहे. नवे चेहरे, नवी समीकरणं आणि नेतृत्वाच्या नव्या शक्यता. भाजपमध्ये सध्या सगळीकडे ‘कौन बनेगा पदाधिकारी’चा थरार सुरु आहे.

अकोल्यात सध्या भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून किशोर मांगटे पाटील कार्यरत आहेत. मात्र लवकरच त्यांच्या जागी बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पदासाठी डॉ. अमित कावरे यांचे नाव सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ग्रामीण क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. कावरे हे अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या नावाला बळ मिळत असल्याचं बोललं जात आहे. संघटनेत प्रभावशाली नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमध्ये मजबूत संपर्क ही त्यांची ठळक वैशिष्ट्ये मानली जात आहेत.

घोडदौड सुरू

महानगराध्यक्षपद सध्या जयंत म्हसने यांच्याकडे आहे. पुढेही त्यांच्याकडेच हे पद कायम राहणार असल्याची शक्यता आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजपने काही महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत. संघटनेतील त्यांची धडाडी कायम राहिली आहे. त्यामुळे त्यांनी हे पद पुन्हा मिळवण्याची शक्यता अधिक आहे, असे म्हटले जात आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे सध्याचे अध्यक्ष पवन महल्ले यांची कारकीर्द राहिल्यानंतर आता त्यांच्या जागी नवीन चेहऱ्याची चर्चा सुरू झाली आहे. करण साहू हे नव्या पिढीचे उत्साही कार्यकर्ते असून, युवकांमध्ये त्यांचा प्रभाव लक्षणीय आहे. सध्या कोणतेही पद नसतानाही, त्यांच्या नावाची चर्चा सर्वाधिक होत आहे. संघटनेत नवा जोश आणि नव्या नेतृत्वाची ओळख म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.

Kirit Somaiya : अचलपुरात एक जानेवारीचा जन्म पंधरा वेळा 

विधानसभा निवडणुकीत अकोला पश्चिम मतदारसंघातून भाजप उमेदवाराचा मोठा पराभव झाला होता. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये यश मिळवण्याचे मोठे आव्हान भाजप पुढे आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीला दमदार महानगर अध्यक्ष गरजेचा आहे. एकंदरीत अकोला जिल्हा भाजपमध्ये सध्या ‘कोण कुठल्या पदावर?’ या प्रश्नावरून विविध गटांमध्ये घमासान चर्चा सुरू आहेत. नवे चेहरे आणि जुन्या कार्यकर्त्यांमधील स्पर्धा आता चुरशीची झाली असून, हे बदल कोणत्या नव्या समीकरणांना जन्म देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपच्या संघटनात्मक रचनेत नव्या नेतृत्वाच्या प्रवेशाने जिल्हा पातळीवर काय घडामोडी घडतील, हे पाहणे रंजक ठरणार आहे. राजकारणात पद हेच प्रतिष्ठेचं प्रतीक, आणि अकोल्यात सध्या हीच प्रतिष्ठेची शर्यत सुरू आहे.

व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!